esakal | 'मी संगमनेरकर' आंदोलनाला यश! अखेर स्थानिकांना टोलमधून दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

mi sangamnerkar agitation

'मी संगमनेरकर' आंदोलनाला यश! अखेर स्थानिकांना टोलमधून दिलासा

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर फास्ट टॅग प्रणालीचा फटका स्थानिकांना बसत होता. त्यांनी अनेकदा टोल प्रशासनाविरोधात आंदोलने केली. मात्र तरीही हा प्रकार सुरुच होता. राजकारण विरहित ‘मी संगमनेरकर’ या बॅनरखाली एकवटलेल्या नागरिकांनी नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तूर्तास त्यांना टोलमधून दिलासा मिळाला आहे.

सुमारे चार वर्षांपासून काम अपूर्ण असतानाही महामार्गावर टोल वसुली सुरू आहे. या मनमानीचा परिसरातील शेतकरी, दुग्धोत्पादक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार आदींसह वाहनचालकांना बसत होता. टोलनाका परिसरातील स्थानिकांना टोल माफी असल्याचे व्यवस्थापन सांगत असले, तरी प्रत्यक्षात सूट दिली जात नव्हती. मागील अनेक दिवसांच्या या त्रासाला कंटाळलेल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी आज (बुधवार) टोल आकारणी बंद करण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा: सभेला यायचं अन् उपाशी जायचं; सदस्यांची झेडपीच्या सभेत नाराजी


यावेळी मनमानी करणाऱ्या व्यवस्थापनाला पाठीशी घालणाऱ्यांचा वक्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच तालुक्यातील ५० किलोमीटर अंतरातील रस्त्यांची दुरुस्ती, सर्व्हिस रोड, साईड गटार, खचलेल्या साईडपट्ट्या, दुभाजकांवर वाढलेली झुडपे, बंद पथदिवे आदींच्या दुरुस्तीची तसेच स्थानिकांसाठी फास्टटॅग विरहित स्वतंत्र मार्गिका तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली. टोल व्यवस्थापक अमित राणा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना स्थानिकांना टोलमधून सूट देत असल्याचे मान्य केले. मात्र इतर मागण्या वरिष्ठांना कळवू, असे सांगितले. महिन्याभरात सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी निवेदन स्वीकारले.


दोन तास वाहतूक ठप्प

वारंवार मागणी करूनही टोल आकारला जात असल्याने परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले होते. आज पक्षविरहित आंदोलनात पुरुषांसह महिलांनीही मोठी उपस्थिती दर्शविली. आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

हेही वाचा: शिर्डीत होणार जिल्हा पर्यटन माहिती केंद्र; रोजगाराची संधी

loading image
go to top