Politics : पराभवामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics : पराभवामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी

Politics : पराभवामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच (दि.८ मार्चला) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मविआचं बहुमत असून देखील जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकला.

राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत भाजपने मोठी खेळी खेळत एका मताने बँकेची सत्ता खेचून आणली. अध्यक्ष पदासाठी भाजपने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. तर मविआकडून राष्ट्रवादीने माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी दिली मात्र एका मताने शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचे सहा संचालक आहेत. तर महाविकास आघाडीचे १४ संचालक आहेत. पुरेसे संख्याबळ असून देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अॅक्शन मोडवर आले आहेत.

राष्ट्रवादीच्या संचालकांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संख्याबळ असतानाही पराभव कसा झाला? याची चौकशी करण्यात येणार असून अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

दरम्यान या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाल्यामुळं पक्षाच्या युवक आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व संजय कोळगे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि जिल्हा सहकारी बँकेतील फुटीर संचालकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राजकीय घडामोडी घडल्या होत्या. या घडामोडी जिल्हाध्यक्षांना माहिती असायला हव्या होत्या. त्यांनी या घडामोडीची माहिती वरिष्ठ नेत्यांना द्यायला हवी होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फायदा भाजप करू घेऊ शकते.

टॅग्स :BjpNCP