Crime News : राहुरी : आधी आकस्मात मृत्यूची नोंद, दोन वर्षांनंतर हत्येचा गुन्हा; कारण काय?

Ahmednagar Crime News : गुंजाळे (ता. राहुरी) येथे दोन वर्षांपूर्वी प्रदीप एकनाथ पागिरे (रा. गुंजाळे) यांना बंदुकीची गोळी लागली. त्यात, त्यांचा मृत्यू झाला.
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime Newsesakal

राहुरी - गुंजाळे (ता. राहुरी) येथे दोन वर्षांपूर्वी प्रदीप एकनाथ पागिरे (रा. गुंजाळे) यांना बंदुकीची गोळी लागली. त्यात, त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी बंदूक जप्त केली. परंतु, सबळ पुराव्याअभावी आकस्मित मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर काल (रविवारी) त्याच गावातील एका तरुणाविरुद्ध आर्म ॲक्टसह खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अक्षय कारभारी नवले (रा. गुंजाळे, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मृत प्रदीप पागिरे यांचे बंधू अविनाश एकनाथ पागिरे (वय ३६, रा. गुंजाळे) यांनी काल (रविवारी) राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हंटले की, 'गुंजाळे येथे बंधू प्रदीप एकनाथ पागिरे शिलाई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या दुकानासमोर आरोपी नवले याचे घर आहे. त्यामुळे आरोपीची त्यांच्याकडे नेहमी उठबस होती. ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० दुकानात आरोपी नवले बसला होता. काहीतरी कारणामुळे आरोपीने प्रदीपच्या नाकावर बंदुकीतून गोळी मारली. ती गोळी प्रदीपच्या मानेत जाऊन अडकली.'

"आरोपी नवले याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीप ला स्वतःच्या चारचाकी वाहनातून अहमदनगर येथे एका रुग्णालयात हलविले. तेथे वाहन पार्किंग करून येतो. असे सांगून आरोपी फरार झाला. रुग्णालयात उपचारापूर्वी प्रदीपचा मृत्यू झाला. त्यावेळी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.'

दरम्यान, नातेवाईकांना हत्याप्रकरणी गावातून माहिती मिळाली आहे. त्याआधारे आरोपी अक्षय नवले याने प्रदीपचा खून केल्याचा संशय आहे.' असेही फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

'घटना दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी साक्ष पुरावा नसल्याने पागिरे यांची हत्या झाली की, आत्महत्या केली. याचा निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे, आकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्यावेळी घटनेतील बंदूक जप्त केली होती. आता, मृताच्या भावाने संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. बंदूक रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून येणाऱ्या अहवालानुसार आरोपीला अटक केली जाईल.

- संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, राहुरी.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com