Ahmadnagar News: महसूल विभाग ॲक्शन मोडवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmadnagar News

Ahmadnagar News: महसूल विभाग ॲक्शन मोडवर

संगमनेर : राज्य शासनाने कडक निर्बंध लादल्यानंतरही संगमनेर शहर व परिसरातून विविध मार्गांनी वाळूचोरी सुरू आहे. शहरातील प्रवरा नदीकाठच्या गंगामाई घाट परिसरातील वाळूच्या गोण्यांचे छायाचित्र एका सजग नागरिकाने सोशल मीडियावर टाकताच महसूल विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे.

राज्याच्या महसूलमंत्रिपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागताच गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील गौण खनिजाचा प्रश्न सातत्याने चर्चेत आला आहे. कालबाह्य झालेल्या जुनाट रिक्षा, बैलगाड्यांचा वापर करून, सरावलेले वाळूतस्कर गरजूंना वाळूपुरवठा करीत आहेत. पोलिस व महसूल प्रशासनाचा धाकही त्यांना उरला नसल्याचे,

चित्र भर दिवसा वाळूच्या गोण्या लादून संगमनेरच्या रस्त्यावरून, बाजारपेठेतून सुसाट वेगाने धावणाऱ्या जुनाट रिक्षांमुळे दिसते आहे. संगमनेर शहर परिसरासह संगमनेर खुर्द, कासारा दुमाला येथील प्रवरापात्रातून पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर टायरच्या ट्यूब, तसेच बैलगाड्यांचा वापर करून काढलेली वाळू गोण्यांत भरून रिक्षांमधून पोचवली जाते.

या सर्व ठिकाणी रोजंदारीवरील खबऱ्यांचे बारीक लक्ष असते. काल गंगामाई घाटावर फिरण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाने घाटावर रचून ठेवलेल्या वाळूच्या गोण्यांचे मोबाईलमध्ये घेतलेले छायाचित्र एका समूहावर टाकताच त्यावर अनेकांची कमेंट केल्या.

त्यामुळे अॅक्शन मोडमध्ये आलेल्या महसूल विभागातील नायब तहसीलदार गणेश तळेकर, तलाठी संग्राम देशमुख, युवराज जरवाल, मंगल सांगळे, पोमल तोरणे यांच्या पथकाने आज संगमनेर खुर्द व गंगामाई घाटावरील वाळूच्या गोण्या जाळून नष्ट केल्या. तसेच, एका खबऱ्याची दुचाकी जप्त केली आहे.

यापूर्वी विविध कारवाईत २२ रिक्षा जप्त केल्या आहेत. त्यांचा पुनर्वापर टाळण्यासाठी त्यांचा मोडतोड करून लिलाव करण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांत तीन वाळूतस्करांना हद्दपार केले असून, यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे.

- अमोल निकम, तहसीलदार