अहमदनगर : जिल्हा परिषद गट-गणांची प्रारूप रचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर

अहमदनगर : जिल्हा परिषद गट-गणांची प्रारूप रचना जाहीर

अहमदनगर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट-गणांचा प्रारूप आराखडा आज (गुरुवारी) प्रसिद्ध झाला. झिगझॅग पद्धतीने झालेल्या रचनेत गट-गणांची तोडफोड करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीच्या १७० गणांचा प्रारूप आराखडा २५ मे रोजी विभागीय महसूल आयुक्तांना जिल्हा प्रशासनातर्फे महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी सादर केला. त्यात पूर्वीच्या गटांच्या ७३ या संख्येत नव्याने १२ गटांची, तर १४६ गणांच्या संख्येत २४ गणांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कोणते गाव कोणत्या गणात व गटात राहणार, कोणते गाव अन्य गण- गटात जाणार, याबाबत गावागावांत उत्सुकता शिगेला पोचलेली होती. आता गट व गणांचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्याने इच्छुकांचा जीवात जीव आला आहे. हक्काची गावे दुसऱ्या गटात व गणात गेल्याने मागील पाच वर्षे काम करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

आठ जूनपर्यंत हरकती अन् २७ जूनला अंतिम रचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी गट-गणांचा प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी आठ जूनपर्यंत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे त्या सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी होऊन विभागीय आयुक्तांकडून २२ जूनला गट-गण रचना अंतिम करणार आहे. २७ जूनला अंतिम गट-गण रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील.

लोकसंख्येनुसार गण अन् गटांची रचना

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ३६ लाख चार हजार आहे. जिल्हा परिषदेच्या गटासाठी ४३ हजार ४०७ लोकसंख्या गृहीत धरली आहे, तर पंचायत समितीसाठी २१ हजार लोकसंख्येवर गणाची निर्मिती करण्यात आली आहे.

नागरदेवळे जिल्हा परिषदेतच

नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी या तीन ग्रामपंचायतींची मिळून नागरदेवळे नगरपालिका अस्तित्वात आली आहे. तसा अध्यादेश निघाला आहे. त्यामुळे नागरदेवळे वडारवाडी, बाराबाभळी ही तीन गावे जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गण रचनेतून वगळली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यावर ही गावे तूर्त तरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात राहणार आहेत.

नगर तालुक्यात सात गट अन् १४ गण

मागील निवडणुकीवेळी नगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व १२ गण होते. यंदा सात गण व १४ गण झाले आहेत. चिचोंडी पाटील, नागरदेवळे जेऊर, देहरे, वाळकी, दरेवाडी, नवनागापूर हे सात गट असून, देहरे पिंपळगाव माळवी, जेऊर, शेंडी, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, केकती, चिचोंडी पाटील, दरेवाडी, अरणगाव, निंबळक, वाळकी, गुंडेगाव हे १४ गण असतील.

निंबळक गट संपुष्टात

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नव्याने झालेल्या प्रारूप गट-गण रचनेत निंबळक गटाची नव्याने निर्मिती कण्यात आली आहे. जेऊर, नागरदेवळे, दरेवाडी, चिचोंडी पाटील हे स्वतंत्र गट करण्यात आले आहेत.

पहिला दिवस निरंक

हरकती दाखल करण्यासाठी आज (ता. २) पासून सुरुवात झाली आहे. मात्र जिल्ह्यातून पहिल्या दिवशी एकही हरकत दाखल झालेली नाही.

Web Title: Ahmednaga Zilla Parishad Group Structure Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top