Ahmednagar Accident : पांढरीपूल येथे विचित्र अपघातात सात जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : पांढरीपूल येथे विचित्र अपघातात सात जखमी

सोनई : पांढरीपूल घाट संपल्यानंतर बसने (एमएच २० बीएल ३५८४) ब्रेक दाबताच पाठीमागून भरधाव आलेल्या मालमोटारीने (एमपी २० एचबी ५३४०) जोराची धडक दिली. यामुळे अन्य तीन वाहनांना धडक बसली. बसमधील पाच व अन्य दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

पाच वाहनांच्या विचित्र अपघाताने नगर-औरंगाबाद रस्त्यावर दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. आज दुपारी पांढरीपूल येथे भेळ सेंटरसमोरील वाहन अचानक रस्त्यावर आल्याने कळमनुरी बसने जोरात ब्रेक लावले. त्यानंतर एकामागे एक अपघात घडू लागले.

अपघातात टाटा हारेर मोटार (एमएच १७ सीआर ३९६३), माध्यान्ह भोजन योजनेची टाटा इंट्रा (एमएच १६ सीडी २६७८) व अन्य एका मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे अभिषेक मुरकुटे यांच्या मोटारीचा अपघातात समावेश आहे. अपघात झाल्यानंतर सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, फौजदार राजू थोरात, पोलिस कर्मचारी रामदास तमनर, सचिन ठोंबरे, सुनील पालवे, तसेच सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, सोनईचे माजी सरपंच हरिभाऊ दरंदले व युवकांनी जखमींना मदत व वाहतूक सुरळीत केली.

गतिरोधक वाढविण्याची मागणी

इमामपूर घाट उतरताना अनेक चालक वाहन बंद करतात. घाट ते वांबोरी चौकापर्यंत गतिरोधक आहेत. मात्र येथे गतिरोधक वाढविण्याची मागणी होत आहे. याच रस्त्यावर भेळ सेंटर आहे. या भेळ सेंटरसमोर रस्त्यावरच वाहने थांबत असल्याने अनेकदा अपघात होतात. प्रशासनाने येथील व्यावसायिकांना वाहनतळांची सक्ती करणे आवश्यक आहे.