अहमदनगर झाले थ्री स्टार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये व कचरा कुंडली मुक्त शहर अशी नवी ओळख नगर शहराने मिळवली आहे. या नव्या ओळखीमुळे नगर शहराच्या पदरात केंद्राकडून 15 ते 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणे निश्‍चित झाले आहे. 

नगर : नगर शहर म्हटले की डोळ्यासमोर अस्वच्छता खराब रस्ते असे चित्र उभे राहायचे. यामुळे नगरला सुधारित खेडे असे उपहासाने शहराबाहेरील लोक म्हणत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये व कचरा कुंडली मुक्त शहर अशी नवी ओळख नगर शहराने मिळवली आहे. या नव्या ओळखीमुळे नगर शहराच्या पदरात केंद्राकडून 15 ते 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणे निश्‍चित झाले आहे. 

तत्कालीन महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग एक डिसेंबरला निवृत्त झाले. आयुक्‍त पदरिक्‍त झाल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्‍तपदभार आला. नगर शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्‍न होता. जिल्हाधिकारी द्विवेदी व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी हे आव्हान स्वीकारले. नगर शहराने जानेवारी महिन्यामध्ये भारत स्वच्छता अभियानातील स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविला. या पूर्वी नगर शहर देशातील पहिल्या 100 शहरांतही कधी स्थान मिळवू शकले नव्हते. मात्र अवघ्या एका महिन्यात नगर शहराने स्वच्छतेची जोरदार मोहीम राबविण्यात आली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मोहिमेचे नेतृत्त्व केले. महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक कुमार सारसर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे, स्वच्छता अभियानाचे समन्वयक सुरेश भालसिंग यांच्यासह महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत स्वतःला झोकून दिले. 17 ते 18 तास या मोहिमेत सर्वपक्षीय नगरसेवक, महापालिका अधिकारी व कर्मचारी काम करत होते. जिल्हाधिकारी व महापौरांच्या आवाहनानुसार शहरातील सर्व सामाजिक संघटना, समाजसेवक व नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतला. या अद्‌भूत ऐकीने नगर शहराला अवघ्या 15 दिवसांत स्वच्छ शहर अशी नवी ओळख मिळवून दिली. 

नगर शहरातील रस्त्याच्या कडेला कचरा, मातीचे ढीग होते. वाऱ्यामुळे हा कचरा शहरभर धावायचा. महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हे ढीग काढले. पुण्यातील स्वयंभू ट्रान्सपोर्टला घंटागाड्या व घनकचरा वाहतुकीचा ठेका देण्यात आला. शहरात 65 घंटागाड्या सकाळी व मध्यरात्री धावू लागल्या. नगरकरांच्या घर व बाजारपेठांत रोज सकाळी घंटागाडी येऊ लागल्याने कचरा कचराकुंड्यांपर्यंत न जाता सरळ घंटागाड्यांत विसावू लागला. त्यामुळे कचराकुंड्यांची 15 दिवसांत गरज संपली. त्यामुळे नगर शहर कचराकुंडी मुक्‍त झाले. स्वच्छ झालेले नगर शहर सुंदर दिसू लागले. 

त्याच वेळी महापालिकेतील एक पथक शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालये स्वच्छ करण्याची मोहीम राबवित होते. शहरातील सर्व शौचालये स्वच्छ करण्यात आली. जानेवारी महिन्याच्या अखेरीला स्वच्छता सर्वेक्षणचे पथक नगर शहरात दाखल झाले. या पथकाने नगर शहरातील स्वच्छता विषयक कामांची पाहणी केली. त्यासंदर्भातील अहवाल केंद्राला पाठविला. त्यानुसार आज केंद्र शासनाने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेचा निकाल जाहीर केला आहे. यात नगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले. नगर शहराला स्वच्छते बाबत कोणतेही मानांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महापालिकेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे. या मानांकनामुळे नगरला 15 ते 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार हे निश्‍चित झाले आहे. 

हे मानांकन मिळाले याचा सिंहाचा वाटा जिल्हाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळालेला. स्वच्छते बाबत नगर शहराने आज इतिहास घडविला आहे. 
- बाबासाहेब वाकळे, महापौर, नगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar became a three star