
Ahmednagar : मद्य पिऊन साक्ष देणाऱ्यावर संमनेरमध्ये गुन्हा दाखल
संगमनेर : न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात मद्य प्राशन करून साक्ष देणाऱ्याविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ देमाजी चत्तर (वय ४९, रा. नान्नज दुमाला, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर एका नियमित खटल्याची सुनावणी सुरु होती. यात सोमनाथ चत्तर यांची साक्ष सुरु होती. या दरम्यान साक्षीदार मद्याच्या अमलाखाली असल्याची बाब आरोपीच्या वकिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी साक्षीदारावर आक्षेप घेतला.
त्यामुळे साक्षीदाराची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात केलेल्या तपासणीत साक्षीदाराने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
संगमनेर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक अधीक्षक मेहमूद बिबन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात मद्य प्राशन करून, न्यायालयात साक्षीकामी हजर राहून गैरशिस्तीचे वर्तन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.