Ahmednagar Traffic : शहरातील उड्डाणपूल सुरू, तरी थांबेना शहरातील वाहतूक कोंडी Ahmednagar city Traffic issue flyover police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Issue

Ahmednagar Traffic : शहरातील उड्डाणपूल सुरू, तरी थांबेना शहरातील वाहतूक कोंडी

- अरुण नवथर

अहमदनगर - शहरातील सुमारे तीन लाख वाहनांचे नियमन करण्यासाठी अवघे ५५ वाहतूक पोलिस आहेत. त्यातही नुकत्याच झालेल्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये २३ वाहतूक पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे अवघे ३० ते ३५ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उरले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नगर शहराच्या हद्दीतून गेलेल्या सात महामार्गांवरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यात जिल्ह्यात सुमारे १५ लाख वाहनांची नोंद आहे. एकट्या नगर शहरात तीन लाखांहून अधिक वाहने आहेत. त्यामुळे नगर शहराला मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा भार सहन करावा लागत आहे. उड्डाणपूल झाला की वाहतूक थोडी-फार सुरळीत होईल, असे नगरकरांना वाटले, पण तसे काही झाले नाही.

उलट, वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. शहरात वाहतूक कोंडीचे ४२ स्पॉट आहेत; परंतु मनुष्यबळाअभावी त्यावर नियंत्रण ठेवण्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेला अपयश येत आहे. परिणामी, नगरकरांना भर उन्हात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. कोठला, मार्केट यार्ड चौक, सक्कर चौक, माळीवाडा बसस्थानक, दिल्ली गेट, अमरधाम, कापड बाजार, टिळक रोड, सर्जेपुरा, बोल्हेगाव फाटा या प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झालेली आहे.

पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. आहे त्या कर्मचाऱ्यांना आजारपण, लग्नकार्य, वाढदिवस अशा कारणांसाठीदेखील रजा मिळत नाही. वाहनांची संख्या ज्या पटीत वाढत आहे, त्या तुलनेत शहर वाहतूक नियंत्रण शाखा सक्षम करणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने मागील अनेक वर्षांपासून या शाखेकडे दुर्लक्ष केलेले आहे.

ट्रॅफिक सिग्नल बंद

शहरातील १५ पैकी मोजक्याच चौकांत ट्रॅफिक सिग्नल सुरू आहेत. नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील डीवायएसपी चौक आणि पत्रकार चौक वगळता इतर ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नलची बोंबच आहे. पत्रकार चौकातील सिग्नलदेखील कधी बंद, तर कधी सुरू असतो. प्रेमदान चौकातही अशीच परिस्थिती आहे. इतर चौकांत तर ट्रॅफिक सिग्नल, ट्रॅफिक नियम यांबाबत नगरकर आणि पोलिस प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचा आरोप नगरकर करत आहेत.

वाहतूक नियमांची पायमल्ली

  • चौकांमधील सिग्नल यंत्रणा नियमित सुरू नसते

  • पी-वन, पी-टू तारखेनुसार पार्किंग होत नाही

  • अंतर्गत रस्त्यावर वन-वे ची अंमलबजावणी नाही

  • नो-पार्किंग झोनचे फलक उरले नावापुरतेच

  • अवजड वाहतुकीला मिळतेय अभय

शहर वाहतूक नियंत्रण शाखा शहरातील वाहतुकीचे नियमन करत आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत.

- मोरेश्वर पेंदाम, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

  • ०३ - लाख शहरातील वाहने

  • १५ - लाख वाहने जिल्ह्यात

  • १५ - शहरातील प्रमुख चौक

  • ३२ - वाहतूक पोलिसांची संख्या