
Ahmednagar News : जिल्ह्यात थांबेना गोळीबार; केडगावचा तपास थंडच
अरुण नवथर
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्षभरात तब्बल ६५ गावठी पिस्तुले आणि शंभरपेक्षा अधिक जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. मात्र, तरीदेखील शहर व जिल्ह्यातील गोळीबार थांबण्यास तयार नाही.
चार दिवसांपूर्वीच केडगाव उपनगराजवळ एका प्राध्यापकाचा गावठी पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आला. या खुनाचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून वर्षभरात ३० पेक्षा अधिक आरोपींना अटक
करून त्यांच्याकडून ६५ गावठी पिस्तुले आणि शंभरपेक्षा अधिक जिवंत काडतुसे जप्त केली. वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच तारकपूर बसस्थानकावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
यापूर्वी केडगावची दुहेरी हत्या, जामखेडची हत्या, घोडेगाव येथे झालेला बेधुंद गोळीबार, ही गावठी पिस्तुलातून गोळीबार झालेली काही उदाहरणे आहेत. केडगाव येथे चार दिवसांपूर्वी प्राध्यापकाची गावठी पिस्तुलातून गोळीबार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही. या घटनेमुळे गावठी पिस्तुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचा तपास पोलिस करत आहेत. मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुले खरेदी करून त्यांची शहर आणि जिल्ह्यात विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे पोलिस तपासात वेळोवेळी समोर आलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी विशेष मोहीम राबवून या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या होत्या, परंतु आता हे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच किरकोळ वादातून गोळीबाराच्या अनेक घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. या घटनांना आवर घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातून येतात पिस्तुले
मध्य प्रदेशातील उंबरठी, लालबाग कामठी, बडवानी, सेंधवा येथील तरुण गावठी पिस्तुले घेऊन थेट नगरमध्ये दाखल होतात. येथील सराईत गुन्हेगार ही पिस्तुले एजंटांपर्यंत पोचवितात. संबंधित एजंट ही पिस्तुले घेऊन पाच ते २५ हजार रुपयांत विकतात.
त्यातून जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढण्यास हातभार लागत आहे. त्यात नेवासे, घोडेगाव, सोनई या भागात सर्वाधिक गावठी पिस्तुलांची विक्री होत असल्याचे पोलिस तपासात समोर आलेले आहे.
स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष
गावठी पिस्तूल जवळ बाळगणे, त्याची विक्री करणे, याप्रकरणी आतापर्यंत सर्वाधिक मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जाऊन ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक पोलिस मात्र या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यातूनच गोळीबार आणि खुनाच्या घटना शहर आणि जिल्ह्यात वारंवार घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.