
Ahmednagar crime : न्यायालयाबाहेरच दिला पत्नीला तलाक
राहुरी : राहुरी न्यायालयात मंगळवारी (ता. २१) पोटगीचा खटला सुरू असताना, बाहेर पत्नीला तीन वेळा तलाक बोलून, सोडचिठ्ठी देऊन पती निघून गेला. याप्रकरणी पत्नीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
जावेद अफसर शेख (पती) व रफद जावेद शेख (रा. हडपसर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता नाजनीन जावेद शेख (वय ३०, हल्ली रा. करपे इस्टेट, राहुरी) असे फिर्यादीचे नाव आहे.
११ मे २०१४ रोजी जावेद शेखशी नाजनीनचा विवाह झाला. हडपसर, पुणे येथे सासरी काही दिवस व्यवस्थित नांदविले. नंतर हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. २०१५ मध्ये सासरच्या लोकांनी राहुरी येथे माहेरी आणून सोडले. २०१८ मध्ये पोटगीसाठी याचिका दाखल केली. त्याची राहुरी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
राहुरी न्यायालयात मंगळवारी (ता. २१) सुनावणीची तारीख होती. जावेद न्यायालयात हजर होता. दुपारी दोन वाजता सुनावणीचे कामकाज आटोपले. त्यामुळे वडिलांसमवेत सर्व जण घरी जायला निघाले. एवढ्यात जावेद फिर्यादी नाजनीन जवळ आला. ‘मी दुसरे लग्न केले आहे. माझ्या दुसऱ्या बायकोने तुला तलाक द्यायला सांगितले आहे,’ असे सांगून तीन वेळा तलाक म्हटले. ‘तुला तलाक दिला आहे’ असे सांगून पती निघून गेला.