Ahmednagar crime news : बापलेकांवर सिनेस्टाईल हल्ला ; हल्लेखोर पसार Ahmednagar crime news Rashin-Karjat road Cinestyle attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

Ahmednagar crime news : बापलेकांवर सिनेस्टाईल हल्ला ; हल्लेखोर पसार

राशीन : राशीन-कर्जत रस्त्यावर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मोढळे वस्ती फाट्यानजीक बाभूळगाव दुमाला येथील बापलेकांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास राशीन-कर्जत रस्त्यावर कर्जतकडून बाभूळगावकडे दुचाकीवरून निघालेल्या विठ्ठल माळवदकर (वय २७) व हनुमंत माळवदकर (वय ५५) यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने धडक देऊन खाली पाडले. त्यांतील पाच-ते सहा जणांनी तलवार व लोखंडी रॉड आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला.

यात दोघांना गंभीर मार लागला. जखमींना आरोपींनी डिकीत घालून नेल्याची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी पोलिसांना कळवली. मात्र, यातील मारेकऱ्यांनी मदतीसाठी येणाऱ्यांनाही हत्याराने धमकावले. ही माहिती पोलिसांना कळताच ग्रामसुरक्षा दलाच्या फोनवरून पोलिसांनी संबंधित कार अडविण्याचे आवाहन खेड ग्रामस्थांना केले. बॅरिकेड्स लावून कार अडविली. मात्र, त्यातील आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार होण्यात यशस्वी झाले. या घटनेत वापरलेली शस्त्रे व गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपींनी प्राणघातक हल्ल्यानंतर घटनास्थळापासून २० किलोमीटरवर असलेल्या बाभूळगाव येथील शाळेसमोरील चौकात अत्यवस्थ जखमींना टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

या घटनेतील जखमींवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला असून, लोखंडी रॉडचा वापर आरोपींनी केला आहे.

- सतीश गावित,सहायक पोलिस निरीक्षक