
अहमदनगर : बाप्पा पोचले परदेशात व्यवसायावर तीन हजार कुटुंबीयांची मदार
अहमदनगर : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोरोनाचे विघ्न दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरच्या गणेशमूर्तींना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आदी देशांतून मागणी आहे. येथील गणेशमूर्ती कारखानदारांनी आतापर्यंत विदेशात शाडूमातीच्या ७०० मूर्ती पाठविल्या. देशभरात तब्बल तीन लाख गणेशमूर्तींची विक्री झाली आहे.
नगरच्या गणेशमूर्तींना देशभरात मोठी मागणी आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणारे कारखानदार आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली होती. यंदा मात्र उत्सवावरील सर्व निर्बंध हटविल्याने येथील गणेशमूर्ती कारखानदार नव्या जोमाने कामाला लागले. सहा इंच ते १६ फूट उंचीच्या लाखो गणेशमूर्ती त्यांनी तयार केल्या आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगण, कर्नाटक या राज्यांतून मूर्तींना मागणी आहे. येथील दीडशे कारखान्यांमधील सुमारे तीन हजार कारागीर दिवसरात्र काम करून बाप्पाच्या आकर्षक मूर्ती घडवत आहेत. मागणीनुसार मूर्ती तयार करून दिल्या जात आहेत. सर्वाधिक मागणी मुंबई व पुणे येथून आहे.
राजस्थानातील प्लॅस्टर ऑफ पॅरिस, केरळचा काथ्या आणि गुजरातचा रंग आणून येथील कारागीर सुंदर आणि आकर्षक मूर्ती घडवत आहेत. आणखी दोन ते अडीच लाख मूर्तींची विक्री होणार असल्याचा कारखानदारांचा अंदाज आहे.
यंदा आकर्षण ‘आयोध्या’चे
दर वर्षी लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. यंदादेखील ती कायम आहे; मात्र या मागणीत आणखी एक नाव वाढले आहे, ते म्हणजे अयोध्या मंदिर गणपती. कारागिरांनी गणेशाच्या मूर्तीमागे अयोध्या मंदिर साकारले आहे. या मूर्तींना मोठी मागणी आहे. त्याचबरोबर सिंह बैठक, कृष्ण प्रभावळ, साईबाबा गणेश या मूर्ती मागणीनुसार तयार करण्यात आलेल्या आहेत.
गणरायाने कोरोनाचे विघ्न दूर केले. त्यामुळे दोन वर्षांपासून बंद असलेले आमचे कारखाने पुन्हा सुरू झाले. एक जूनपासून मूर्तींच्या विक्रीला सुरवात झाली. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच इंधन यांच्या दरात वाढ झालेली आहे. परिणामी, या वर्षी मूर्तींच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासाठी शाडूमातीच्या घरगुती मूर्ती दिल्या आहेत.
- प्रफुल्ल लाटणे, गणेशमूर्ती कारखानदार, नगर
Web Title: Ahmednagar Demand For Ganesha Idols
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..