Ahmednagar : नगर शहराचा विकास आणि आगामी निवडणुका, याबाबत आमचं ठरलं ; उपमुख्यमंत्री फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Ahmednagar : नगर शहराचा विकास आणि आगामी निवडणुका, याबाबत आमचं ठरलं ; उपमुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : नगर शहराचा विकास आणि आगामी निवडणुका, याबाबत आमचं ठरलं आहे. सर्वांगीण विकासाचे काम करावे, अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याकडून अपेक्षा आहे. फडणवीस स्वतः शहरविकासाचा ॲक्शन प्लॅन तयार करणार आहेत. पुढे महापालिकेत भाजप पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करेल, असा विश्वास भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी व्यक्त केला.

सकाळ टीमने गंधे यांच्याशी संवाद साधला. आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. गंधे म्हणाले, ‘‘नगर शहरात पूर्वीपासूनच भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात आता नवीन मतदारांची भर पडली आहे. सध्या आम्ही शहर भाजपच्या वेगवेगळ्या ५० सेलच्या माध्यमातून काम करत आहोत. त्यातून हजारो पदाधिकारी सध्या कार्यरत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन पक्षसंघटन अधिक मजबूत केले जाणार आहे.

‘‘शहरविकासाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र, आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नगरमध्ये लक्ष घातले आहे. शहराचा विकास आणि आगामी निवडणुकांबाबत आमचं सर्व काही आतापासूनच ठरलं आहे. त्याचा ॲक्शन प्लॅन देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत,’’ असे गंधे यांनी सांगितले.

विखे पाटलांवर विश्‍वास

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची कार्यपद्धती पाहूनच पक्षाने त्यांना राज्यात सर्वांत महत्त्वाचे महसूलमंत्रिपद दिले. त्यांच्यावर पक्षासह जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याचा विश्वास आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुका भाजप एकहाती जिंकेल, असा विश्‍वासही गंधे यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. सुजय विखे यांचेदेखील शहरविकासाकडे लक्ष आहे. उड्डाणपुलाच्या कामातील अडथळे दूर करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवार आयात करणार नाही

विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपचाच आमदार होईल. शहर भाजपकडे चार ते पाच चांगले उमेदवार आहेत. त्यात कार्यकर्त्यांकडून माझ्याही नावाचा आग्रह आहे. पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. पक्षात निवडून येणारा उमेदवार असेल, तर अन्य पक्षातून उमेदवार आयात केला जात नाही. नगर शहरातदेखील उमेदवार आयात करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे गंधे यांनी स्पष्ट केले.

महापालिकेत तरुणांना संधी

आगामी महापालिका निवडणुकीत सुशिक्षित, सामाजिक भान असलेल्या तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी मायक्रो लेव्हलवर काम सुरू आहे. जुन्या मतदारांप्रमाणेच नवीन मतदारदेखील भाजपला मानणारा आहे, असेही गंधे यांनी यावेळी सांगितले.