Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या चर्चेत आला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar nagar

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या चर्चेत आला

अहमदनगर : जिल्ह्याचे विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. गेल्या दोन दशकांपासून ठरावीक काळानंतर या मुद्द्याला हवा दिली जाते. थोडे-फार आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर तो प्रश्न थंड बस्त्यात पडतो. दक्षिणेतील नेते विभाजनाच्या मुद्द्यावर एक होतात. पक्षीय राजकारण सोडून त्यांना या मुद्द्यावर एकत्र यायचे असते. खासगीत ते तसे मान्यही करतात. मात्र, उत्तरेतील काही नेते विभाजनावर गप्प असतात, तर काही जण तो विषय हाणून पाडतात. असे असले तरी सामान्य माणसांना विभाजन हवे आहे.

‘सकाळ’ने समाजमनाचा कानोसा घेतल्यानंतर त्यांच्यातील ही भावना पुढे आली आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा मुद्दा आला की अहमदनगरचाही विषय पुढे येतो. त्यासाठी वेगवेगळी नावे सुचवली जातात. राजकीय चष्म्यातूनही काही नावे पुढे ढकलली जातात. मुख्यतः नगरच्या विभाजनावर कॉमन मॅनचा भर आहे.

जिल्ह्याचे प्रशासकीय कारभारासाठी उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग पाडले आहेत. दोन्हीकडे आरटीओचे पासिंगचे (१६ आणि १७) क्रमांकही वेगळे आहेत. उत्तर भागातील तालुके सधन आहेत. पाटपाण्यामुळे ही सधनता आली आहे. साखर कारखाने, दूधउत्पादन, शैक्षणिक संस्था आणि इतर बाबींमुळे उत्तर विभागातील लोकांचे जीवनमान उंचावले आहे.

दक्षिण भागातील तालुके हे बहुतांशी दुष्काळी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जीवनस्तरही वेगवेगळा आहे. परिणामी, त्यांचे प्रश्नही भिन्न आहेत. नगर हे मुख्यालय दक्षिणेतील तालुक्यांसाठी जवळचे आहे, तर उत्तरेतील अकोले, संगमनेर, कोपरगाव तालुक्यांसाठी दूरचे आहे. त्यांना किरकोळ कामासाठी नगरला येणे जिकिरीचे असते.

उत्तरेचे दक्षिणेवर प्राबल्य

उत्तरेतील नेते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रबळ ठरतात. तुलनेने दक्षिणेतील नेत्यांना, अपवाद वगळता मोठी कामगिरी करता आली नाही. त्यांच्यावर नेहमीच उत्तरेतील नेत्यांचा प्रभाव असतो. बऱ्याचदा ते त्यांचे कार्यकर्ते म्हणूनच मिरवतात. एकंदरीत, सर्वच पातळ्यांवर विचार करता, दोन्हीकडील सामान्य माणसांना विभाजन हवे आहे, यावर त्यांचे एकमत दिसते.