अवकाळीचा तडाखा ; ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

शुक्रवारी पहाटे नगर शहर व परिसरासह अकोले, पाथर्डी तालुक्‍यांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून असणारे ढगाळ हवामान व पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. काढलेल्या कांद्यांना कोंब फुटू लागले आहेत. पिकांवर करपा, मावा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्वारीवर चिकटा पडला असून, औषधफवारणीवरील खर्च वाढला आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे नगर शहर व परिसरासह अकोले, पाथर्डी तालुक्‍यांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 

गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान व पावसाच्या सरी कोसळत आहेत. राहुरीत जोरदार पाऊस झाला. अकोल्यातही पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. नगर तालुक्‍यात कांद्यावर करपा रोग पडला आहे. पावसामुळे काढलेल्या कांद्यांना कोंब फुटत आहेत. जामखेड, कर्जत तालुक्‍यांतील काही भागात पावसाने हजेरी लावली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अकोल्यात नुकसान
 
अकोले : तालुक्‍यातील राजूर, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे नामदेव देशमुख, किसन येडे यांनी सांगितले. गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाल्याने, भुईमूग, हरभरा, मका, बाजरी, वांगी, मिरची, जनावरांचा चारा, ऊसपीक सपाट झाला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अचानक पाऊस व धुके आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. 

शेरी-चिखलठाणमध्ये जोरदार सरी 

राहुरी : तालुक्‍यात गुरुवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह संततधार सुरू होती. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता शेरी-चिखलठाण येथे जोरदार पाऊस झाला. त्यात शेतात बांधावरून पाणी वाहिले. उभी पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे पिके सडण्याचा धोका आहे. गवार, मेथी, कोबी, घास, मका, कांदा, ऊस, गहू पिकांत पाणी साचले. सुमारे शंभर एकर टरबूजाच्या वाड्यांमध्ये पाणी भरले. 

पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याची स्थिती झाली आहे. पिकांसाठी औषधे, प्लॅस्टिक कापडावरील खर्च वाढला आहे. 
- सोपान कराळे, शेतकरी, आगडगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In ahmednagar district rains are causing severe damage to crops