esakal | रयतच्या निवडणुकीकडे लागलंय लक्ष, नगरमधून यांची नावे चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar district's attention to the election of Rayat Shikshan Sanstha

रयत शिक्षण संस्थेवर नगर जिल्ह्रयाचेच वर्चस्व कायम आहे. जिल्ह्यात शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी संख्याही मोठी आहे. कै. शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे यांनी रयतचे चेअरमनपद भूषवले आहे. सध्या उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, अरूण कडू हे काम पाहतात. तर विभागाचे अध्यक्षपद दादाभाऊ कळमकर भूषवित आहेत.

रयतच्या निवडणुकीकडे लागलंय लक्ष, नगरमधून यांची नावे चर्चेत

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठी संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे पाहिले जाते. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं काम कोणी केलं असेल तर ते रयतने. कर्मवीर अण्णा यांनी रयत नावाचं वटवृक्षाचं रोपटं लावलं. त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात झाला आहे.

या संस्थेवर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि आता ज्येष्ठ नेते शरद पवार धुरा सांभाळत आहेत. या संस्थेने राज्याच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केलं. संस्थेतील पारदर्शीपणामुळे ती विस्तारली आणि गुणवत्ता टिकवू शकली. संस्थेतील पदाधिकाऱ्यांनीही शिक्षण यज्ञ सातत्याने तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आता या महिनाअखेरीस २७ तारखेला संस्थेची निवडणूक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही पदाधिकारी निवड होत आहे.

रयतचा विस्तार कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आहे. कामकाजाच्या सुलभिकरणासाठी पाच विभाग पाडण्यात आले आहेत. त्यात उत्तर विभागात नगर, नाशिक, बीड, नंदूरबार हे जिल्हे येतात. पश्चिम विभागात पुण्याचा समावेश होतो. सातारा, सोलापूर हे मध्य विभागात येतात. कोल्हापूर, सांगली, कर्नाटक दक्षिण विभागात मोडते. कोकण रायगड विभागात समाविष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - कर्जत-जामखेडच्या शिक्षणात रोहित पवारांमुळे आलं डिजीटल पर्व

मॅनेजिंग कौन्सिलमध्ये, लाईफ मेंबर असलेल्या सेवकांमधून अकराजण निवडले जातात. या सर्वांमधून चेअरमनची निवड केली जाते. उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिवांची त्यातून निवड होते. पाच विभागासाठी पाच अध्यक्ष केले जातात. राजकीय मंडळी आणि संस्थेतील सेवकांची मिळून ही बॉडी बनते. कामात सुसूत्रता यावी यासाठी मंडळाची अशी रचना करण्यात आली आहे. 

रयत शिक्षण संस्थेवर नगर जिल्ह्रयाचेच वर्चस्व कायम आहे. जिल्ह्यात शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी संख्याही मोठी आहे. कै. शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे यांनी रयतचे चेअरमनपद भूषवले आहे. सध्या उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, अरूण कडू हे काम पाहतात. तर विभागाचे अध्यक्षपद दादाभाऊ कळमकर भूषवित आहेत. नवीन पिढीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे चांगले काम करीत आहेत. अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे सचिव आहेत तेही नगरकर आहेत. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ते प्राचार्य होते.

मॅनिजिंग कौन्सिलवर मीनाताई जगधने, आमदार बबनराव पाचपुते आणि नाशिकमधून भगीरथ शिंदे कार्यरत आहेत. यांच्याव्यतिरिक्त अजित पवार, दिलीप वळसे पाटील, रवींद्र पवार, एन.डी. पाटील, विश्वजीत कदम, राम ठाकूर, आबासाहेब देशमुख हे बॉडीवर आहेत. तर डॉ. अनिल पाटील हे चेअरमन आहेत.

संस्थेत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, चेअरमन आणि सचिव या पदाला मोठे महत्त्व आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता संस्थेत रोटेशन पद्धतीने पदे दिली जातात. एका विभागाला सचिवपद गेले तर चेअरमन दुसरीकडचा केला जातो. मात्र, प्रत्येक निवडणुकीत नगर जिल्ह्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मागील वेळी भाजपात गेलेल्या आमदार बबनराव पाचपुते यांना संधी मिळाली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता जे मॅनेजिंग कौन्सिलवर आहेत, त्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. त्यात पाचपुते यांच्या पदाबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. तेच कायम राहतात की दुसरा कोणाची वर्णी लागते, हे औत्सुक्याचे आहे.

सचिवपदासाठी फिल्डिंग

आपल्या मर्जीतील किंवा जिल्ह्यातील सचिव व्हावा यासाठी मोर्चेबांधणी केली जाते. यंदाच्या निवडणुकीपूर्वीही ती सुरू आहे. नगर जिल्ह्यातून श्रीगोंद्यातील प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. शिवलिंग मेदनकुळे, प्राचार्यं प्रतिभा गायकवाड, प्राचार्य डॉ. शिवणकर, प्राचार्यं बी.टी. जाधव यांची नावे चर्चेत आहेत. ही पदाधिकारी निवड तीन वर्षांसाठी असणार आहे.