Ahmednagar : बंबाचीच बोंब ! आवश्यकता आठची; कार्यरत दोनच युनिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंबाचीच बोंब ! आवश्यकता आठची; कार्यरत दोनच युनिट

बंबाचीच बोंब ! आवश्यकता आठची; कार्यरत दोनच युनिट

अहमदनगर: शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन दलाची यंत्रणा पुरेशी नाही. ५० हजार लोकसंख्येसाठी अग्निशमन दलाचा एक विभाग (युनिट) आवश्‍यक असतो. महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा विचार करता, आठ युनिट गरजेची आहेत. आग, आपत्तीनिवारणासाठी आवश्‍यक असणारी अत्याधुनिक साधनेही या विभागाकडे नाहीत.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

महाराष्ट्र राज्य नगररचना अधिनियम १९६६, या कायद्यातील तरतुदीनुसार शहरी भागाची रचना केली जाते. राज्य शासनाने २६ नोव्हेंबर २०१५ रोजी या कायद्यात सुधारणा केल्या आहेत. तरतुदीनुसार बाग, मैदाने, शाळा, रुग्णालय, सांस्कृतिक सभागृह आदी विविध सार्वजनिक वापरासाठी जागांचे आरक्षण ठेवले जाते. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते. आग अन्यत्र पसरून जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका जास्त असतो. आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दल तत्काळ पोचणे आवश्‍यक आहे. त्यानुसारच ५० हजार लोकसंख्येसाठी अग्निशमन दलाच्या एका युनिटची तरतूद आहे.

दोनच युनिट कार्यरत

अग्निशमन दलामध्ये कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्यूटी असते. एका युनिटमध्ये चार ते पाच चालक, फायरमन अशा दहा ते बारा जणांची नियुक्‍ती असते. सब-ऑफिसर, स्टेशन ऑफिसर यांच्या नियुक्‍त्या असतात. अहमदनगर शहराची लोकसंख्या चार लाखांपर्यंत आहे. त्या प्रमाणात चार अग्निशमन युनिटची गरज आहे. प्रत्यक्षात दोनच युनिट आहेत. शहरातील माळीवाडा भागात जुनी महापालिका आणि सावेडीला आकाशवाणी केंद्राशेजारी ती कार्यरत आहेत. अग्निशमन दलात प्रशिक्षित कर्मचारीही कमी आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागातील मदतनीस (बिगारी) असलेले निम्मे कर्मचारी या विभागात प्रतिनियुक्‍त्यांवर कार्यरत आहेत. त्यांना आग विझविणे, आपत्तीच्या काळात परिस्थिती हाताळण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण नाही. मात्र, अनुभवावर ते परिस्थिती हाताळत आहेत.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

आकृतिबंधाचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

अहमदनगर नगरपालिकेचे २००३ मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. त्यावेळी कर्मचारी आकृतिबंध तयार करण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या महापालिकांचा अभ्यास दौरा केला. त्यावर वेळोवेळी चर्चाही झाली. त्यानंतर राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला. अग्निशमन दलाचाही आकृतिबंधाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मंत्रालयाने अद्याप मान्यता दिली नाही. प्रस्ताव धूळ खात पडला आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची (फायरमन) पदोन्नती रखडली आहे. फायरमनला सब-ऑफिसर, स्टेशन ऑफिसर आदी पदांवर बढती दिली जाते.

अत्याधुनिक साधनांची कमतरता

अहमदनगर शहरात पूर्वी पाच मजल्यांपर्यंत इमारती बांधण्यास परवानगी होती. रुग्णालय किंवा विशेष इमारतींसाठी परवानगी वाढविण्यात आली आहे. शहरात आता १० ते १५ मजले असलेली रुग्णालये उभारली गेली आहेत. अशा बहुमजली इमारतींमध्ये दुर्दैवाने आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाकडील हायड्रॉलिक पॉवर शिडीद्वारे पीडितांना बाहेर काढले जाते. मात्र, अग्निशामक दलाकडे तशी अत्याधुनिक साधने नाहीत.

loading image
go to top