Ahmednagar Fire : डॉ. पोखरणांच्‍या जामिनावर आज सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Fire

Ahmednagar Fire : डॉ. पोखरणांच्‍या जामिनावर आज सुनावणी

अहमदनगर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर महावितरण कंपनीने तपासी अधिकाऱ्यांकडे म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे. डॉ. पोखरणा, तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या जामिनावरही त्याच वेळी सुनावणी होणार आहे. गिरीश जाधव यांच्या हस्तक्षेप अर्जावरील निर्णयही याच वेळी दिला जाणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या अर्जावर तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे म्हणणे मागविले आहे. मिटके जळीतकांडाचा तपास करीत आहेत. महावितरण कंपनीकडे जळीतकांडाच्या अनुषंगाने म्हणणे मागविले होते. महावितरणला चार वेळा नोटिसा देऊनही त्यांनी म्हणणे सादर केले नाही. याप्रकरणी आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

जिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश ढाकणे यांनीही अटकपूर्व जामीन अर्ज दाखल आहे. त्यांचे वकील एन. के. गर्जे सुनावणीच्या वेळेस अनुपस्थित होते. त्यामुळे ही सुनावणीही शुक्रवारी होणार आहे. शिवसेनेचे शहर उपप्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हा रुग्णालयातील सुविधांकडे प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्यांनी डॉ. पोखरणा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये त्रयस्थ व्यक्‍ती म्हणून म्हणणे सादर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यावरील युक्‍तिवाद पूर्ण झाला आहे. त्यांच्या वतीने ॲड. अभिजित पुप्पाल यांनी काम पाहिले. त्यावरील निर्णयही शुक्रवारीच दिला जाणार आहे.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

सरकारी वकिलांच्या भूमिकेवर आक्षेप

डॉ. पोखरणा आणि डॉ. ढाकणे यांच्या जामीन अर्जामध्ये सरकारतर्फे ॲड. अनिल ढगे काम पाहत आहेत. डॉ. पोखरणा यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी गिरीश जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर जाधव यांचा हस्तक्षेप स्वीकारू नये, असे म्हणणे ॲड. ढगे यांनी सादर केले. त्यावर जाधव यांनी लेखी स्वरूपात हरकत घेतली आहे. या जामीन अर्जावर सरकारी वकील म्हणून ॲड. केदार केसकर यांनी काम पाहिले.

loading image
go to top