Ahmednagar hospital fire | अखेर सत्य समोर! फुटेजमध्ये भक्कम पुरावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar fire

Ahmednagar hospital fire | अखेर सत्य समोर! फुटेजमध्ये पुरावे

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ahmednagar hospital fire) आग लागली तेव्हाचे भक्कम पुरावे सीसीटीव्हीमध्ये मिळाले आहेत. त्यामुळेच चार जणांना अटक केली आहे, अशी भूमिका पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली.

अर्धा तास एकही डॉक्टर नव्हता; कर्मचाऱ्यांचे चहापान

विभागात आग लागल्यानंतर सुरवातीची १५ मिनिटे रुग्ण वगळता एकही डॉक्‍टर किंवा कर्मचारी या विभागात नव्हता. तब्बल २५ मिनिटांनी या विभागात नियुक्तीला असलेले डॉक्‍टर आणि परिचारिका आल्या. उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांनी आत जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण नंतर कोणीही आत गेले नाही. काही कर्मचारी तर बाहेर चहा घेत होते.

भक्कम पुरावे आहेत

या विभागात ज्यांची नियुक्‍ती होती, त्यांनी आपल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी हजर राहणे आवश्‍यक होते. त्यांनी आपली जबाबदारी टाळली. हा निष्काळजीपणा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या भक्कम पुराव्यांमुळेच चौघींना अटक केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने सुरवातीच्या चौकशीत कर्मचाऱ्यांनी, इतर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सांगितले. मात्र, सर्वांच्या जबाबात विसंगती आढळली, तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळून येत नाही.

हेही वाचा: "१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक"; कंगनाच्या विधानावरून नवा वाद

हा निव्वळ निष्काळजीपणा

अतिदक्षता विभागातील एका किंवा दोघांनी सकारण बाहेर जाण्यास हरकत नाही, पण एकाच वेळी २५ मिनिटे तीन-तीन जण बाहेर जात असतील, तर हा निष्काळजीपणाच आहे. नियुक्त डॉक्‍टर व कर्मचारी यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केला आहे. आग लागल्याचे समजताच रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले असते, तर काहींचे प्राण वाचवता आले असते. आग कोणत्या कारणामुळे लागली, त्यामध्ये कोण दोषी आहे, याचाही पोलिस सखोल तपास करीत आहेत, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक अद्याप आरोपी नाहीत

शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आणि पोलिस तपास याचा संबंध नाही. पोलिसांची फौजदारी कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई सुरू आहे. त्यामुळे निलंबित केलेल्या सर्वांना अजून आरोपी केलेले नाही. अटकेत असलेले चौघेच सध्या आरोपी आहेत. शल्यचिकित्सकांचा अद्याप आरोपी म्हणून समावेश नाही.

हेही वाचा: राज्यात कुठे पाऊस, तर कुठे थंडी! जाणून घ्या सविस्तर

चार जण तेथे नव्हते...

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली तेव्हा कर्तव्यावर असूनही चार जण तेथे नव्हते, याचे भक्कम पुरावे सीसीटीव्हीमध्ये मिळाले आहेत. त्यामुळेच चार जणांना अटक केली आहे, अशी भूमिका पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडात पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत या चौघींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाची भूमिका पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केली.

रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला गेल्या शनिवारी (ता. ६) सकाळी १०.४८ ते १०.५० च्या सुमारास आग लागली. एक महिला तिच्या पतीला बघायला आत गेली तेव्हा तिनेच आरडाओरडा केल्यानंतर आग लागल्याचे समजले. एक मुलगा आत जाऊन त्याच्या वडिलांना बाहेर घेऊन आला, तर एक रुग्ण ऑक्‍सिजन मास्क काढून स्वत:च जमिनीवर रांगत बाहेर आला. नंतरच्या १० मिनिटांत खासगी व्यक्तींनी आत जाऊन रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.’’

loading image
go to top