Jayant patil : सत्ता जाण्याच्या भीतीने राष्ट्रवादी लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant patil

Jayant patil : सत्ता जाण्याच्या भीतीने राष्ट्रवादी लक्ष्य

शिर्डी : राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टीका होते, याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. राज्यात राष्ट्रवादी पक्षाकडून सत्ता धोक्यात येऊ शकते, या भीतीमुळेच सत्ताधाऱ्‍यांकडून आपल्या पक्षावर टीका होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर सुरू झाले आहे. यावेळी प्रथम झेंडावंदन व त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक करताना पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, की राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत असताना सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला निवेदन दिले. मात्र, सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्षे झाली आहेत. शरद पवार हे या शिबिराला कालच येणार होते. मात्र, ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. ही कामे लोकांपर्यंत जायला हवीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी उपस्थित होते.

४० आमदारांच्या बंडामागे कोण ?

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात, यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते, अशी टीका जयंत पाटील केली.

दूरदृश्‍य प्रणालीव्दारे शरद पवारांची उपस्थिती

आजार, व्याधी, दुःख, त्रास असा कोणताही शब्द ज्या व्यक्तीला जनमाणसात मिसळण्यापासून विभक्त करू शकत नाही, हा आपला शब्द खरा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अचानक भेट दिली. ही भेट कार्यक्रमाबरोबरच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरली.