लष्कराच्या व्हीआरडीई स्थलांतराचा प्रश्न, नगरच्या नेत्यांची पुन्हा शरद पवारांकडे धाव

मार्तंड बुचुडे
Friday, 8 January 2021

स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या या संस्थेच्या देशभरात 52 शाखा आहेत. संस्थेने देशासाठी अनेक संशोधने केली आहेत. संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख आहे.

पारनेर ः देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील रावळपिंडीजवळ असलेल्या चखलाला प्रांतातून व्हीआरडीईचे नगर शहरात स्थलांतर करण्यात आले होते. ही संस्था म्हणजे नगरसाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची अतिशय महत्वाची आठवण आहे.

ही संस्था चेन्नई येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यास आपला ठाम विरोध आहे. ही संस्था नगर येथून हलवू नये या साठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या अश्‍वासनाप्रमाणे लवरकच या प्रश्‍नी संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. 

स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या या संस्थेच्या देशभरात 52 शाखा आहेत. संस्थेने देशासाठी अनेक संशोधने केली आहेत. संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख आहे. संरक्षण विभागासाठी आवश्‍यक असलेली वाहने तसेच अन्य सामग्रीही विकसित करण्यात नगरच्या व्हीआरडीईचा मोलाचा वाटा आहे. वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा विशेष ट्रॅक नगरच्या व्हीआरडीई येथे आहे. 

हेही वाचा - सुरत-हैदराबाद रस्ता तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणणार रस्त्यावर

संस्थेसाठी नगर जिल्हा तसेच परिसरातील शास्त्रज्ञांनी, कर्मचा-यांनी आजवर मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेत सुमारे एक हजार सेवक वर्ग काम करीत आहे. त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. यातील अनेक जण परराज्यातील असले तरी ते नगर येथेच स्थायिक झाले आहेत.

देशाच्या संरक्षण विभागात संस्थेचे महत्वपूर्ण स्थान असून शहर व परिसराच्या विकासात मोठे योगदान आहे. नगर येथे लष्कराचा मोठा तळ आहे. त्यासाठी ही संस्था येथेचे असणे योग्य आहे. असे असताना संस्था नगर येथून हलविणे योग्य नाही. त्यामुळेच पवार यांच्या माध्यमातून या प्रश्‍नी आपण पाठपुरावा करीत आहेत. पवार हे लवकरच केंद्रीय संरक्षणमंत्री यांचीही या कामी भेट घेणार आहेत असेही लंके यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar leaders run to Sharad Pawar again