
Ahmednagar Politics : थोरातांनी लोकसभा लढविल्यास रंगत - खासदार डॉ. सुजय विखे
अहमदनगर - काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे अनुभवी नेते आहेत. लोकसभेच्या अहमदनगर जागेसाठी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक स्पर्धात्मक आणि रंजक होईल, अशी शक्यता खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ‘मोदी@९ (मोदी ॲट नाइन)’ जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माहितीसाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. विखे बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दिलीप भालसिंग, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील. ज्याला उमेदवारी दिली जाईल, त्या उमेदवाराचे काम सर्व जण करतील. पक्षाचा आदेश अंतिम राहील. केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हाची परिस्थिती आणि आता नऊ वर्षांनंतरची परिस्थिती पाहता, आमूलाग्र बदल झालेला आहे. प्रामुख्याने गरिबांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा उल्लेख करता येईल.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात कोट्यवधी गरिबांसाठी घरे बांधून देण्यात आली आहेत, घरोघरी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेद्वारे पिण्याचे पाणी पोचविण्यात आले आहे. शेतकरी सन्मान योजना, पीक विमा, यांसारख्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.
अशा योजनांतून गरिबांचे कल्याण याबरोबरच महिला सक्षमीकरण धोरण हेदेखील अत्यंत प्रभावीपणाने या नऊ वर्षांत राबविले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तरी या जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा रस्ते, पायाभूत सुविधा, विमानतळ यांसारख्या विविध बाबींकरिता मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे.
पारनेरमध्ये परिवर्तनाची नांदी
पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ही पारनेरमध्ये परिवर्तनाची नांदी आहे, हे स्पष्ट होत आहे. तरीही काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.