अहमदनगर : सोसायटीच्या सभेत झाले मास्तर तर्राट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत यंदाही गोंधळ झाला.

अहमदनगर : सोसायटीच्या सभेत झाले मास्तर तर्राट!

अहमदनगर: माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत यंदाही गोंधळ झाला. काही सभासद शिक्षक नशेत असल्यामुळे ते काय बोलत होते, हे कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. बोलण्यासाठी अगदी माईकची ओढाओढ झाली. त्यात तो तुटला. या मद्यपींमुळे इतर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी तर ही कीड लागली आहे, ती कधी जाणार नाही... अशी नाराजी व्यक्त केली.

माध्यमिक शिक्षक सोसायटीची ७६ वी सर्वसाधारण सभा दोन वर्षानंतर ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मिसाळ होते. उपाध्यक्ष अण्णासाहेब ढगे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, महेंद्र हिंगे, चांगदेव खेमनर, ज्ञानेश्वर काळे, काकासाहेब घुले, बाबासाहेब बोडखे, अप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

अध्यक्ष मिसाळ यांच्या मनोगतानंतर सभेला सुरवात झाली. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचनास स्वप्निल इथापे वाचू लागले. मागील सभेतील मुद्द्यांची नोंद इतिवृत्तात का घेतली नाही, असा मुद्दा अप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला. त्यानंतर वादंग सुरू झाले. गोलगोल उत्तरे देऊन सभासदांची बोळवण करू नका, असे विरोधी संचालक व सभासदांमधून बोलले जात होते. कचरे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

कचरेंमुळे सोसायटीचे ‘सोने’

तब्बल आठ वर्षे प्रशासकाच्या ताब्यात असलेली सोसायटी ताब्यात घेत ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी सलग २५ वर्षे नेतृत्व केले. या संस्थेला जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात दिशादर्शक म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून लौकिक मिळवून दिला आहे. त्यांच्यानंतर नेमके कोण नेतृत्व कोण करणार व कोण कचरे यांचा वारसा चालविणार, अशी चर्चा सभासदांमध्ये सुरू होती.

डाटा सेंटरला विरोध अन् मंजूर

सोसायटीमधील डाटा सेंटरमधील सर्व्हर भाडेतत्वावर घेण्यास विरोधी गटाचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी विरोध केला. यावर बराच वेळ चर्चा झाली. डाटा सेंटरला विरोध दर्शविण्यात आला. मात्र सर्व विषयांमध्ये हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ संचालक कचरे यांनी मी सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे देता यावी, म्हणून आज सभा घेतल्याचे सांगितले. सचिन फटांगरे यांनी सभा मे महिन्यात घ्यावी, असा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

जेवले अन् सभासद निघून गेले

सभेमध्ये दरवर्षी गोंधळ होत असतो. हे प्रत्येक सभासदाला माहिती झालेले आहे. त्यामुळे काहीजणांनी सभा स्थळी हजेरी लावून ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांना शुभेच्छा देऊन जेवणाचा अस्वाद घेतला अन् खरेदीसाठी बाजारात अनेकजण निघून गेले.

यावर झाली चर्चा

सोसायटीतील नोकर भरती

ऑनलाईनवर कोट्यवधीचा खर्च कशासाठी

जागा खरेदीचा मुद्दा

कर्मचारी बसून पगार घेतात

सभा बेकायदेशीर आहे

सभासदांच्या वारसांना नोकरीस घ्या

हे ठरले वादंगाचे मुद्दे

प्रश्नाला अध्यक्षांऐवजी भाऊसाहेब कचरे उत्तरे देत होते

विरोधकांना बोलून का देत नाही?

विरोधी संचालक बोलताना सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वाद

Web Title: Ahmednagar Master Tarrat Meeting Society

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top