मागोवा २०२०: कोरोनामुळे महापालिकेचे वार्षिक नियोजन कोलमडले 

अमित आवारी
Monday, 4 January 2021

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना महामारीच्या उपाययोजनांत गेले. त्यामुळे महापालिकेचे कामाचे वार्षिक नियोजनच कोलमडले. याचा फटका शहरातील विकास कामे व नागरी प्रश्‍नांना बसला. 

 नगर: यंदाचे वर्ष महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना महामारीच्या उपाययोजनांत गेले. त्यामुळे महापालिकेचे कामाचे वार्षिक नियोजनच कोलमडले. याचा फटका शहरातील विकास कामे व नागरी प्रश्‍नांना बसला. 

महापालिकेत वर्षाच्या सुरवातीलाच स्वच्छता सर्वेक्षण अभियानासाठी केलेल्या कामाबद्दल थ्री स्टार मानांकन मिळाले. शहर पहिल्यांदाच कचराकुंडी मुक्‍त झाले. स्थायी समितीचे आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाले. मात्र त्यानंतर प्रशासकीय पेच व कोरोना लॉकडाउनमुळे नवीन आठ सदस्यांची निवड व पर्यायाने स्थायी समिती सभापती निवडीला विलंब लागला. कोरोना लॉकडाउनमुळे महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रियाही लांबली. लॉकडाउन शिथिल होताच पाच स्वीकृत नगरसेवक व स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या निवडी जाहीर झाल्या. भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरत स्थायी समिती सभापतीपद मिळविले. त्यावेळी भाजपकडून कारवाईच्या वल्गना करण्यात आल्या, मात्र शेवटी ते लुटूपुटूची लढाई ठरले. 

कोरोनामुळेच यंदा मार्चमध्ये जाहीर होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प आठ महिने उशिराने जाहीर झाला. सावेडी कचरा डेपोचे याच वर्षी बुरुडगाव येथील कचरा डेपोत स्थलांतर करण्यात आले. बुरुडगाव कचरा डेपोमध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 11 कोटी रुपयांचे प्रकल्प उभे करण्यात आले. कोरोना काळात लॉकडाउन असल्याने महापालिकेची मालमत्ताकर वसुली थंडावली. त्यामुळे महापालिकेने दीड महिने 75 टक्‍के शास्ती माफी तर 15 दिवस 50 टक्‍के शास्ती माफी जाहीर केली. शहरातील अनेक पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. हे सुरू करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट एलईडी प्रकल्प मंजूर केला. 

शहरातील सर्जेपुरातील हत्ती चौक ते फलटण पोलिस चौकी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच तारकपूर ते रामवाडी मार्गे सर्जेपुरा रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले. या रस्त्यातील रामवाडी भागातील अतिक्रमणे काढण्याचे काम अजूनही बाकी आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांनी चालविले कम्युनिटी किचन 

कोरोना काळात शहरात 26 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करावे लागले. त्यामुळे शहरात अनेकांचे रोजगार बुडले. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वखर्च व दात्यांची मदत घेऊन कम्युनिटी किचन उपक्रम राबविला. त्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे अन्न मिळाले. या शिवाय महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात शहरात स्वच्छता ठेवली. त्यामुळे कोरोना प्रसाराचा वेग कमी राहिला. या शिवाय महापालिकेने विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने कोविड सेंटरही चालविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municapl corporation planning collapsed in 2020