
महापालिकेतील अनेक विकासकामे सध्या निधीअभावी थांबली आहेत. सावेडी उपनगरातील नाट्यगृहाचे काम निधी नसल्याने बंद पडले आहे.
नगर ः महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. याच दरम्यान महापालिकेचे आयुक्त सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आला आहे. त्यामुळे महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून निधीची अपेक्षा असून, 26 कोटींचा निधी मिळावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
महापालिकेतील अनेक विकासकामे सध्या निधीअभावी थांबली आहेत. सावेडी उपनगरातील नाट्यगृहाचे काम निधी नसल्याने बंद पडले आहे. ते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी निधीची गरज आहे. त्याकरिता महापालिकेने पाच कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजनला सादर केला आहे.
नगरोत्थान योजनेतून (जिल्हास्तर) दहा कोटींची मागणी केली आहे. त्यातून शहरातील रस्ते व अन्य नागरी प्रश्न सोडविण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
या बरोबरच दलित वस्ती विकासासाठी 10 कोटी, तर दलितेतर वस्ती विकासासाठी सहा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या चारही प्रस्तावांसंदर्भात जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
तिला महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नियती किती क्रूर आहे बघा
बैठकीत डॉ. भोसले यांनी, महापालिकेकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. बैठकीनंतर पालक सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या चारही प्रस्तावांची माहिती दिली. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला यापैकी किती निधी मिळतो व त्यावर महापालिका कोणत्या विकासकामांना वेग देणार, हे ठरणार आहे.
महापालिकेचे प्रस्ताव
नाट्यगृह - पाच कोटी
नगरोत्थान - पाच कोटी
दलित वस्ती - दहा कोटी
दलितेतर वस्ती - सहा कोटी
अहमदनगर
जिल्हा नियोजन समितीकडे महापालिकेने 26 कोटींच्या निधीसाठी चार प्रस्ताव सादर केले आहेत.
- डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त, सामान्य प्रशासन, महापालिका , अहदमनगर