नियती किती क्रूर असते बघा, लोकांना मरणाच्या दारातून काढणाराच का अडकला तिथे

विलास कुलकर्णी
Tuesday, 5 January 2021

अशा गरीब परिस्थितीत संदेश याने कोरोना काळात गरजूंची मदत केली. नगर-मनमाड रस्त्यावरील खड्डयांविरुद्ध आंदोलनात, रुग्णांना रक्ताची गरज पडली तर कायम अग्रभागी राहिला. आता, त्याच्यावर नियतीची वक्रदृष्टी पडली. 

राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील एक तरुण नगर येथे खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजाराने व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी संघर्ष करतोय. आतापर्यंत साडेतीन लाख रुपये खर्च झाला. त्यांच्या घरातील परिस्थिती बेताची. मित्रांना माहिती समजली. संकटात मित्र धावले.

सोशल मीडियात आवाहन करून, अवघ्या चार दिवसांत दीड लाखांची मदत जमविली. सोशल मीडियाचा वापर सत्कर्मासाठी करून, मित्रांनी सामाजिक भान जपले.

संदेश सुहास पाटोळे (वय 21, रा. राहुरी फॅक्टरी) असे आजारी तरुणाचे नाव. स्थापत्य अभियंता डिप्लोमा पूर्ण करून, राहुरी फॅक्टरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी तो कार्यरत आहे. वडील तनपुरे कारखान्याच्या सेवेत असले तरी, तीन महिन्यातून एखादा पगार होत असल्याने घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

हेही वाचा - चाळीस रूपयांच्या साडीवर झाले आदिवासींचे धर्मांतर

अशा गरीब परिस्थितीत संदेश याने कोरोना काळात गरजूंची मदत केली. नगर-मनमाड रस्त्यावरील खड्डयांविरुद्ध आंदोलनात, रुग्णांना रक्ताची गरज पडली तर कायम अग्रभागी राहिला. आता, त्याच्यावर नियतीची वक्रदृष्टी पडली. 

संदेशच्या फुफ्फुसात रक्तवाहिनी ढकलली गेली. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. Pulmonary embolism या आजाराने संदेशला ग्रासले. त्याला 15 डिसेंबर रोजी नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

अतिदक्षता विभागात पंधरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. साडेतीन लाख रुपये खर्च झाले. संदेशच्या मित्रांना माहिती समजली. वैष्णवी चौक मित्र मंडळातर्फे "प्लीज हेल्प संदेश" नावाने व्हॉट्स ॲप ग्रुप करण्यात आला.

फेसबुकवर मदतीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. अवघ्या चार दिवसात एक लाख साठ हजार रुपये जमा झाले. संदेशच्या कुटुंबाला आधार मिळाला. सोशल मीडियाद्वारे मित्रांनी सामाजिक भान व सत्कर्म साधले.

 

संदेश पाटोळे या तरुणाने सेवाभावी कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. गरीब कुटुंबातील या तरुणावर संकट ओढवल्याने, त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले. सोशल मीडियाद्वारे आवाहन केल्यावर कुवतीनुसार शंभर ते तीन हजार रुपयांपर्यंत मदत संदेशच्या बंधूच्या बँक खाती जमा झाली. चार दिवसात एक लाख 60 हजार रुपये जमले. आता संदेशची प्रकृती स्थिर आहे.

- वसंत कदम, अध्यक्ष, वैष्णवी चौक मित्र मंडळ, राहुरी फॅक्टरी. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friends on social media ran to help the youth in Rahuri