
कोरोनामुळे लॉकडाउन केल्याने महापालिकेचा यंदा केवळ 13 कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला होता. महापालिकेने 715 कोटी 71 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी शास्तीमाफीची मागणी केली होती.
अहमदनगर : महापालिकेने नोव्हेंबरमध्ये मालमत्ताकराच्या थकबाकीवर 75 टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज या शास्तीमाफीची मुदत संपली. शास्तीमाफीच्या निर्णयाने महिनाभरात महापालिकेने 25 कोटीहून अधिक मालमत्ताकर वसूल केला. त्यामुळे शास्तीमाफीला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कर विभागाची बैठक घेतली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता याबाबत आज दुसरी व अंतिम बैठक होणार आहे. मुदतवाढीच्या निर्णयाकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : विकासकामे 'लॉकडाउन' ! प्रशासकांवर अनेक गावांचा पदभार ; कारभाराची माहितीही नाही
कोरोनामुळे लॉकडाउन केल्याने महापालिकेचा यंदा केवळ 13 कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला होता. महापालिकेने 715 कोटी 71 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी शास्तीमाफीची मागणी केली होती. त्यासाठी महापालिकेत आंदोलनही केले. त्यानुसार, नोव्हेंबरमध्ये नगरकरांसाठी 75 टक्के शास्तीमाफी देण्यात आली.
नागरिकांना मालमत्ताकर भरता यावा, यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांना कोणतीही सुटी दिली नाही. शास्तीमाफीचा लाभ घेत, नागरिकांनी थकीत मालमत्ताकर भरण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयांत रांगा लावल्या. शास्तीमाफीसाठीची मुदत आज संपली. महिनाभरात महापालिकेची 25 कोटींची वसुली झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षात मालमत्ताकर वसुली 38 कोटींच्या घरात पोचली.
हे ही वाचा : मुलासाठी सासरी छळ, विवाहितेला काढले उपाशीपोटी घराबाहेर
दरम्यान, महापालिकेने 2018 मध्ये अशीच शास्तीमाफी दोन महिन्यांसाठी दिली होती. त्याच धर्तीवर यंदाही दोन महिन्यांसाठी शास्तीमाफी देण्याची मागणी विविध सामाजिक संघटना व शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. त्यानुसार आज आयुक्तांनी कर विभागाची बैठक घेऊन वसुलीचा आढावा घेतला. शास्तीमाफीला मुदतवाढ देण्याबाबत चर्चाही झाली; मात्र बैठकीत एकमत न झाल्याने, आज पुन्हा याच विषयावर बैठक होणार आहे. शास्तीमाफीला मुदतवाढ मिळते का, तसेच मिळाली तर ती किती टक्के असेल याची उत्तरे उद्याच बैठकीमध्ये समजू शकतील.
संपादन - सुस्मिता वडतिले