Ahmednagar Municipal Corporation : न मारता बिल्ला,पाच कोटींवर डल्ला!

महापालिकेकडे मोकाट श्‍वाननिर्बीजीकरणाची माहिती उपलब्धच नाही
ahmednagar-municipal-corporation
ahmednagar-municipal-corporationsakal

अहमदनगर : शहर व उपनगरांत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर महापालिकेने तब्बल चार कोटी ७५ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. प्रत्यक्षात निर्बीजीकरण करून किती कुत्र्यांना बिल्ले लावले, याची कोणतीच माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहरात कुत्र्यांची पैदास वाढू नये, यासाठी मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम पुणे येथील ‘पीपल फॉर ॲनिमल’ या संस्थेला देण्यात आले आहे. एका कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी ९५० रुपये संबंधित संस्थेला देण्यात येतात. महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथील केंद्रात हे निर्बीजीकरण करण्यात येते. विशेष म्हणजे निर्बीजीकरण केल्यानंतर, संबंधित कुत्रे ज्या भागातून पकडले तेथेच ते पुन्हा सोडण्यात येते. मागील वर्षभरात अशा सुमारे साडेपाच हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदार संस्थेवर चार कोटी ७५ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

मुळात किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले, ती कुत्री कोणत्या परिसरातील होती, निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांची ओळख पटण्यासाठी त्यांना बिल्ला लावण्यात आला का, याची कोणतीच अधिकृत माहिती महापालिकेच्या दफ्तरी नाही. त्यामुळे साडेपाच हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट होते. ठेकेदार संस्था, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी मिलीभगत करून कुत्र्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते असो की गल्लीबोळ, सर्वत्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. कुत्र्यांच्या भीतीमुळे वयोवृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे सोडून महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी निर्बीजीकरणाच्या नावाखाली स्वतःची घरे भरण्याचे काम करत आहेत.

- शाकिर शेख, सामाजिक कार्यकर्ते

मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम पुणे येथील ठेकेदार संस्थेमार्फत सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या कामाबाबत आढावा बैठक झालेली आहे. किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

- अविनाश हंस, कोंडवाडा विभागप्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com