नगर महापालिकेने अवसान गाळले, कोविड सेंटर सुरूच करीना

अमित आवारी
Monday, 21 September 2020

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने 12 ऑगस्ट रोजी इमारत ताब्यात देत असल्याचे पत्र महापालिकेला दिले. जिल्हा रुग्णालयाने 15 दिवसांपूर्वी इमारत महापालिकेकडे हस्तांतरित केली; पण महापालिकेला तेथे कोविड सेंटर सुरू करण्यात अद्यापि यश आले नाही. 
 

नगर : जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील परिचारिका महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी इमारत देण्याची मागणी महापालिकेने केली. रुग्णालय प्रशासनाने लगेच तसे पत्र त्यांना दिले. महापालिकेने इमारत ताब्यात घेतली; परंतु अजूनही तेथे कोविड सेंटर सुरू केले नाही. महिनाभरापासून ही इमारत रिकामीच आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील परिचारिका महाविद्यालयाच्या इमारतीत सुरवातीला, कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जात होते. तेथे 217 बेड असून, रुग्णांची काळजी व्यवस्थित घेतली जात होती. महापालिकेला कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जागा हवी होती. त्यांनी जिल्हा रुग्णालयाकडे परिचारिका महाविद्यालयाची इमारत कोविड सेंटरसाठी मागितली.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने 12 ऑगस्ट रोजी इमारत ताब्यात देत असल्याचे पत्र महापालिकेला दिले. जिल्हा रुग्णालयाने 15 दिवसांपूर्वी इमारत महापालिकेकडे हस्तांतरित केली; पण महापालिकेला तेथे कोविड सेंटर सुरू करण्यात अद्यापि यश आले नाही. 

तेथे होते सिव्हिलचे कोविड सेंटर 
महापालिकेकडे इमारत हस्तांतरित करण्यापूर्वी तेथे जिल्हा रुग्णालयामार्फत कोविड सेंटर चालविले जात होते. तेथे 217 बेडची व्यवस्था असून, सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांना तेथे ठेवले जात होते. रुग्णाला दम लागणे किंवा श्‍वास घेण्यास त्रास झाल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले जात होते. अहमदनगर

महापालिकेने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी परिचारिका महाविद्यालयाच्या इमारतीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाने ती इमारत महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. 
- सुनील पोखरणा, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक 
 

कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ती इमारत जिल्हा रुग्णालयाने स्वत:होऊन महापालिकेला दिली. दरम्यान, महापालिकेने दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू केली. सध्या ती इमारत राखीव ठेवली आहे. "माझे कुटुंब- माझी जबाबदारी' अभियानात रुग्ण वाढल्यास तेथे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल. 
- अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation will not start Kovid Center