पाणी जिरवण्याचे धडे घेण्यासाठी नगर महापालिकेतील नगरसेवक गेले...

अमित आवारी
Wednesday, 5 August 2020

सावेडी उपनगरातील ओढे- नाल्यांतील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सावेडी उपनगरातील चार नगरसेवक हिवरेबाजार येथे गेले होते.

नगर : सावेडी उपनगरातील ओढे- नाल्यांतील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सावेडी उपनगरातील चार नगरसेवक हिवरेबाजार येथे गेले होते.

तेथे त्यांनी पावसाचे पाणी जिरवण्याबाबतचे धडे राज्याचे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याकडून घेतले. त्यामुळे आता सावेडी उपनगरातील पावसाळ्यात येणाऱ्या पूरस्थितीतून मार्ग निघण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

जगभरातील लोक जलव्यवस्थापनाचे धडे गिरवण्यासाठी हिवरेबाजारला येतात. मात्र नगर महापालिकेतील अधिकारी जलव्यवस्थापन शिकण्यासाठी कधी हिवरे बाजारला गेलेले नाहीत. नगर ओढे- नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पावसाळ्यातील जलव्यवस्थापन करण्याची गरज आहे.

हिवरेबाजार गावाने ओढे- नाल्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. याच धर्तीवर महापालिकेने शहरातील ओढे- नाल्यांचे पुनरुज्जीवन करून पावसाळ्यात येणाऱ्या पूरस्थितीपासून मुक्‍ती मिळवावी, अशी मागणी सावेडी उपनगरातील नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, निखील वारे, बाळासाहेब पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. 

चारही नगरसेवकांनी हिवरेबाजार येथे जाऊन पोपटराव पवार यांची भेट घेतली. तेथील जलव्यवस्थापनाची माहिती घेऊन नगरमधील पूरस्थितीवर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर पोपटराव पवार यांनी सावेडी उपनगरात मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. तसेच वृक्षरोपण कोणत्या वृक्षांचे करावे याबाबतही मार्गदर्शन केले.

महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्र हे हिवरेबाजारमधील अभ्यासिकेच्या धर्तीवर कसे चालविता येईल. यावरही चर्चा करण्यात आली. 

विकासासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छा शक्‍तीची गरज 
शहर, प्रभाग अथवा गाव विकासासाठी केवळ राजकीय इच्छा शक्‍ती असून उपयोग नाही. त्याला प्रशासकीय इच्छा शक्‍तीचीही जोड हवी. तरच विकास होईल, असा कानमंत्र पोपटराव पवार यांनी नगरसेवकांना दिला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal corporators went to Hivrebazar