Ahmednagar News : वाहतूक नियमांच्‍या पालनाबाबत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar News

Ahmednagar News : वाहतूक नियमांच्‍या पालनाबाबत जनजागृती

अहमदनगर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने, रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकरिता शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. अपघातग्रस्तांचे जीवनदूत म्हणून कर्तव्य बजावण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.

तारकपूर बसस्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमाला सहायक परिवहन अधिकारी संदीप खडसे, मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन, तारकपूरचे आगार व्यवस्थापक मनीषा देवरे, कार्यशाळा अधीक्षक अभिजित आघाव, मंगेश बर्डे आदींसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडसे म्हणाले, की स्वत:च्या सुरक्षिततेसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.

अपघातात एखादा कर्ता पुरुष दगावल्यास तो संसार उघड्यावर येतो. कुटुंबीयांच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जीवनदूताची भूमिका पार पाडताना जखमींचा जीव वाचविण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याच्या उद्देशाने जीवनदूताची कर्तव्ये व महत्त्व सांगणाऱ्या माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. सुकन्या क्षेत्रे यांनी उपस्थितांना वाहतुकीचे नियम पाळणे व अपघातग्रस्तांना मदत करण्याची शपथ दिली. गोरक्ष कोरडे यांनी जीवनदूतांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सरोदे व सूरज उबाळे यांनी केले. मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन यांनी आभार मानले.