Ahmednagar : गांधी यांचे स्वप्न विखेंनी पूर्ण केले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : गांधी यांचे स्वप्न विखेंनी पूर्ण केले

अहमदनगर : शहरात उड्डाणपूल व्हावा, हे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांचे हे अधुरे स्वप्न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पूर्ण केले, असे प्रतिपादन आज केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विकासाच्या बाबतीत नगरकरांना देशाच्या नकाशावर आणणार असल्याचा दावादेखील त्यांनी यावेळी केला.

नगरमधील पहिल्या आणि ३३१ कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी उड्डाणपुलाचे शनिवारी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, प्रा. राम शिंदे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले माजी आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, सुवेंद्र गांधी, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

नगर- पुणे महामार्गावरील शिल्पा गार्डन येथे पार पडलेल्या सोहळ्यात शहरासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गडकरी यांनी उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली गडकरी व्यासपीठावर येण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाबाबत नगरकरांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.

गडकरी व्यासपीठावर आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगरकरांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. उड्डाणपुलाचा खरा पाया दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी रचला. त्यांचे उड्डाणपुलाचे स्वप्न खासदार डॉ. सुजय विखे यांनी पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री विखे यांनी स्पष्ट केले. विखे यांचे भाषण संपताच गडकरी यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. दिलीप गांधी यांचे प्रयत्न आणि त्यांच्यानंतर डॉ. सुजय विखे यांचा पाठपुरावा, यामुळेच उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.नगरकरांना लवकरच विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणणार असल्याचा दावादेखील त्यांनी यावेळी केला.

राठोड यांचे नाव पुन्हा राहिले; विखेंची दिलगिरी

उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत ज्या अडचणी होत्या, त्या खासदार डॉ. विखे यांनी दूर केल्या. दिवंगत माजी मंत्री अनिल राठोड यांचेही त्यात मोठे योगदान होते, असा नामोल्लेख फडणवीस यांनी केला. मात्र, केंद्रीय मंत्री गडकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भाषणातून राठोड यांचा नामोल्लेख झाला नाही. गडकरी यांचे भाषण संपल्यानंतर ही बाब पालकमंत्री विखे यांच्या लक्षात आली. त्यांनी राठोड यांचे नाव घेतले नसल्याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनो, ऊर्जादाते व्हा!

इथे बसलेल्या सर्व साखर कारखानदारांना सांगतो, की साखरेचे उत्पादन कमी करा आणि जास्तीत जास्त इथेनॉलची निर्मिती करा. त्यातून शेतकरी केवळ अन्नदाताच नव्हे, तर देशाला ऊर्जा पुरविणारे असतील यासाठी कारखानदारांनी काम करावे, अशी गडकरी यांनी कारखानदारांची कानटोचणी केली.

नगरला ‘लॉजिस्टिक’ करणार

शहरातील महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आधी पूर्ण झाले याचा आनंद वाटतो. सुरत-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातून जाणारी वाहतूक अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात अहमदनगर लॉजिस्टिक होईल. त्यामुळे जिल्ह्यात या रस्त्याच्या परिसरात स्मार्ट ग्राम, स्मार्ट सिटी, औद्यागिक वसाहती निर्माण होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.