
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा
अहमदनगर: धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करू नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून बजावण्यास सुरवात झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी या नोटिसांचा आदर करत, परवानगी घेऊनच महाआरती करण्याची भूमिका घेतली आहे.
शहर आणि भिंगार उपनगरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठविण्यास सुरवात केली आहे. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी फौजदारी न्यायप्रक्रिया संहितेच्या कलम १४९ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करू नये. आंदोलनात्मक कार्यक्रम करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरण्यात येईल. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू नये. घोषणा-प्रतिघोषणांमुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. त्यातून क्षुल्लक कारणानेही तणाव निर्माण होऊ शकतो. शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नोटिसीद्वारे करण्यात आले आहे.
सदरच्या नोटिसा या न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पुढेही सुरूच राहणार आहे.
- अनिल कातकाडे, पोलिस उपअधीक्षक, अहमदनगर शहर
मनसे पदाधिकारी महाआरती करण्यासाठी परवानगी घेत आहेत. ज्या ठिकाणी परवानगी दिली जाईल, त्या ठिकाणी महाआरती करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखली जाईल.
- सचिन डफळ, नेते, मनसे
Web Title: Ahmednagar Notice Maharashtra Navnirman Sena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..