
अहमदनगर : OBC समाज भाजपच्या मागे
अहमदनगर : राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा व ओबीसी समाजांचे हक्काचे आरक्षण गेले. भविष्यात शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षणही हे सरकार घालवेल. ओबीसी समाज भाजपचा आत्मा आहे. म्हणूनच आम्ही आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेत आहोत. नगर शहराचा पुढील आमदार व महापौर भाजपचाच होण्यासाठी ओबीसी समाज पूर्ण ताकदीने काम करेल, असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले.
नगर शहरात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित जागर मेळाव्यात ते बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मेळाव्याचे संयोजक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, महामंत्री शंकर वाघ, शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष रायकर आदी उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, की राज्यातील आघाडी सरकारला ओबीसींचे काहीही देणे-घेणे नाही. जर मध्य प्रदेशामध्ये ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळू शकते, तर राज्यात का नाही? त्यामुळे आता शांत बसू नका, असे आवाहन त्यांनी केले.
गंधे म्हणाले, की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून मोठे काम केले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ते बंद पडले. चांगल्या भविष्यासाठी ओबीसी समाजाने भाजपच्या झेंड्याखाली एकत्र यावे. सूत्रसंचालन उद्धव कळापहाड यांनी केले, तर ज्ञानेश्वर काळे यांनी आभार मानले.