अहमदनगर : अधिकाऱ्यांच्या हाती झाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagar

अहमदनगर : अधिकाऱ्यांच्या हाती झाडू

अहमदनगर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमानिमित्त एक ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ आज जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आला. अधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. या वेळी स्वच्छता रथाद्वारे जनजागृती उपक्रमाचा प्रारंभ झाला.

जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत आहे. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी, उपअभियंता शिवाजी राऊत श्रीकांत टेमकर यांनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्यास प्रारंभ केला. या वेळी इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अमृत पंधरवड्यानिमित्ताने स्वच्छता रथाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ व जलजीवन मिशनच्या विविध घटकांची प्रचार- प्रसिद्धी होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांची माहिती देऊन जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

असे होणार उपक्रम

पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवितो. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) जलजीवन मिशन, शुद्ध पाण्याची उपलब्धता, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थाची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, मानवी विष्ठेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय), सार्वजनिक शौचालय, तसेच जलजीवन मिशनच्या अनुषंगाने स्वच्छता रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी व स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. समाजाला बरोबर घेऊन गाव स्वच्छ, शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी योगदान दिले पाहिजे. सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम राबवून या उपक्रमात सहभागी व्हावे.

आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Ahmednagar Officials Swachhta Ratha Campaign Started

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..