
Ahmednagar : वावरात या अन् कांदा मोफत घेऊन जा
संगमनेर : सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक खर्च करून जिवापाड जोपासलेल्या कांदापिकाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आले आहे. कवडीमोलाने कांदा विकण्यापेक्षा कोणाच्या मुखी गेलेला चांगला, या हेतूने तालुक्यातील पिंपरणेतील युवा शेतकरी धनंजय थोरात यांनी काढणीला आलेला चार एकर कांदा चक्क फुकट वाटला.
स्वयंपाकघरातील गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा सध्या मात्र उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणतो आहे. तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी चार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी सुमारे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. चांगली निगा व मशागत केल्याने कांदा चांगला पोसला होता. काढणीला आलेल्या कांद्यातून फायदा होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. दुर्दैवाने आवक वाढल्याने दर कोसळले. काढणी, पॅकिंग व बाजारात नेण्याचा खर्चही सुटण्याची त्यांची आशा मावळली.
पुढील पिकाला रान मोकळे करण्यासाठी त्यांनी चार एकरांवरील कांदापात शेळ्या-मेंढ्यांना दिली, तर पाहिजे त्याने मोफत कांदा काढून नेण्याचे आवाहन केले. पिंपरणे गावासह जोर्वे, कनोली येथील ग्रामस्थांची कांदा काढून नेण्यासाठी झुंबड उडाली. दोन दिवसांत चार एकर रान मोकळे झाले.
किलोला पाच ते सहा रुपये भाव
किलोला अवघा पाच ते सहा रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा काढणे टाळत आहेत. मजुरी, गाडीभाडे, हमाली, तोलाई व आडत यांचे पैसे खिशातून देण्याची नामुष्की आली असून, लागवडीचा खर्चही हाती पडत नाही. त्यात विजेचा लपंडाव, खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांद्यातून इतरांना चांगला फायदा झाल्याचे पाहिल्याने चार एकरांवर कांदा लावला. मात्र, नशिबाने धोका दिला. भाव कोसळल्याने फसगत झाली. वर्षभरातील आर्थिक बाबींचे केलेले नियोजन फसले. कांदा विकून आणखी तोटा करून घेण्यापेक्षा माणसाच्या मुखी गेलेला काय वाईट, म्हणून मोफत नेण्यास सांगितले. शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही हेच खरे.
- धनंजय थोरात, शेतकरी