Ahmednagar News: २८ किलो गांजासह तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Ahmednagar News: २८ किलो गांजासह तिघांना अटक

अहमदनगर : कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख ६० हजार रुपये किमतीचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

मुकेश अरुण नेटके (वय ३४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, जि. पुणे), जावेद इनायत शेख (वय २१, रा. शिवाजीनगर, स्टेशन रोड, जि. पुणे) व अजय अरुण जोजंट (वय २६, रा. शिवाजी नगर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्या पथकातील उपनिरीक्षक सोपान गोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, संदीप घोडके, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, रोहित येमूल आदींनी नगर-मनमाड रोडवर, नगरकडे येणारी एक कार ताब्यात घेतली. पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता डिकीत ताडपत्रीच्या दोन पिशव्यांत गांजा मिळून आला. गांजा आमचा असून, विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली आरोपींनी दिली.

सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी अजय जोजंट हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अहमदनगर व पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.