
अहिल्यानगर: जिल्ह्यातील दहा हजार ३३१ नागरिकांनी पोलिसांना त्यांच्या कामगिरीबाबत सल्ला दिला आहे. ज्यांनी हा अभिप्राय दिला त्यापैकी ७० टक्के नागरिक पोलिसांच्या कामगिरीबाबत असमाधानी आहेत. विशेष म्हणजे दारू, जुगार व अंमली पदार्थ या अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करण्याचा सल्ला देखील नागरिकांनी दिला आहे, तसेच चांगले काम करणाऱ्या पोलिस ठाण्यांमध्ये नगर तालुका पोलिसांना नागरिकांनी पहिल्या क्रमांकाचे गुण दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी दिलेला हा फिडबॅक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानुसार आम्ही आमच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले आहे.