नगर जिल्ह्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण, मुंबईत खासगी रूग्णालयात उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोरोनाबाधित झालेल्या नेत्याभोवती नेहमी गराडा असतो. एका बाधित अधिकाऱ्यासोबत त्यांनी बैठक घेतली होती.

नगर ः कोरोनाने नगर जिल्ह्याभोवती विळखा आवळला आहे. सर्वसामान्य माणूस, व्यापारी, डॉक्‍टरांना त्याने डंख मारला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून वेगाने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज रात्रीची संचारबंदी केली. आज सायंकाळी दहाजण कोरोनाबाधित आढळले. त्यात मोठ्या राजकीय नेत्याचा समावेश आहे. 

सुरूवातीच्या काळात तबलिगी त्यानंतर मुंबई, पुणे येथून आलेल्यांमुळे कोरोनाची लागण झाली. आता त्यांच्या संपर्कात आलेल्यामुळे हा प्रादूर्भाव वाढत आहे. आज तर एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - भाजप कार्यकारिणीवर नगरचा वचक

कोरोनाबाधित झालेल्या नेत्याभोवती नेहमी गराडा असतो. एका बाधित अधिकाऱ्यासोबत त्यांनी बैठक घेतली होती. तो अधिकारी बाधित निघाल्याने त्यांनी स्वतःहून स्वॅब दिला. त्यानंतर तो अहवाल आज रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.

शनिवारी सकाळी ते पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांना सध्या कसलाही त्रास नाही. लवकर बरे होऊन मतदारसंघात परतू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रूग्णालयात उपचार घेत असल्याचा फोटोही त्यांनी सोशल माध्यमातून शेअर केला आहे.

जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान आज सकाळी २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले.आज दिवसभरात १५० व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.

जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या; ३६९
उपचार घेत असलेले रुग्ण : १६०
मृत्यू: १५
एकूण रुग्ण संख्या : ५४४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar political leader infected with corona