Ahmednagar : जिल्ह्याला पावसाचा तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar rain

Ahmednagar : जिल्ह्याला पावसाचा तडाखा

अहमदनगर : जिल्हाभर बुधवारी रात्री पावसाने सर्वदूर हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यातील आठ मंडलांत अतिवृष्टी झाली. शेवगाव, नगर, पारनेर, श्रीगोंदे, पाथर्डी तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात २८.८ मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बुधवारी रात्री जिल्हाभर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. शेवगाव तालुक्यात सर्वच मंडलांत जोरदार पाऊस झाला. तालुक्यात सर्वाधिक पाऊस चापडगाव आणि बोधेगाव या मंडलांत झाला. त्याखालोखाल भातकुडगाव आणि शेवगाव मंडलात अतिवृष्टी झाली. ढोरजळगावमध्ये ३१ मिलिमीटर, तर एरंडगाव मंडलात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शेवगावमध्ये एका दिवसात ६२ मिलिमीटर पाऊस कोसळला. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात भाळवणी मंडलात अतिवृष्टी झाली.

या मंडलात ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाडेगव्हाण मंडलात ७१ मिलिमीटर, वडझिरे मंडलात ५७ मिलिमीटर आणि सुपा मंडलात ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नगर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, बुधवारी नगर तालुक्याला जोरदार तडाखा दिला.

केडगाव मंडलात अतिवृष्टी झाली, या मंडलात ८८.३ मिलिमीटर अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. अहमदनगर शहराला पावसाने रात्रभर झोडपून काढले. नालेगाव मंडलात ४७.८ मिलिमीटर, सावेडी ४७.५ मिलिमीटर, कापूरवाडी ४० मिलिमीटर, तर भिंगारमध्ये ४०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चास मंडलात ४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. कर्जत तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला. राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.

जामखेड तालुक्याकडे पाठ

जामखेड तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. खर्डा मंडलात पाऊस झालाच नाही, तर जामखेड, अरणगाव, नान्नज, नायगाव मंडलांत अत्यल्प पाऊस झाला. तालुक्यात बुधवारी १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात सरासरी ३१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील धरणांमधून नदीपात्रांत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या संपर्कात राहून आपत्ती आल्यास तातडीने संपर्क करावा.

वीज रोहित्र गेले वाहून टाकळी ढोकेश्वर, पारनेर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मांडओहळ परिसरातील शेतीचे नुकसान झाले. खडकवाडी भागात शिवजाळे, बोरवाक, शेलवाक, वाबळे मळा, कुरणवाडी, गोडसे दरा येथील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तीन हजार एकर क्षेत्र बाधित झाले. शेतकऱ्यांचे वीजपंप वाहून गेले. वीज रोहित्रही वाहून गेले. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी युवा नेते विकास रोकडे, इंद्रभान ढोकळे, शेतकरी नेते किरण वाबळे यांनी केली आहे. लहानू चंदू पवार यांच्या शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. दत्ता गायकवाड यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. टेकाडे मळा परिसरातील राजेंद्र ठुबे यांनी कांदा साठवलेल्या जागेवर सायंकाळी वीज पडल्याने नुकसान झाले.

शेतीपिकांचे नुकसान

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, चोंभूत, अळकुटी, निघोज परिसरात ओढे, तळी तुडुंब भरली. मांडओहळ परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, बाजरी, झेंडू, अशा विविध पिकांचे तीन हजार एकर क्षेत्र बाधित झाले आहे. म्हस्केवाडी शिवारात १२ शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तसेच, तालुक्यात वीज पडून गायीचा मृत्यू झाला. शेवगाव तालुक्यातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Ahmednagar Rain Farmer Agriculture Damage Shevgaon Parner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..