Ahmednagar : विधवांना पुनर्विवाहासाठी १६ हजारांचे अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pension

Ahmednagar : विधवांना पुनर्विवाहासाठी १६ हजारांचे अनुदान

बोटा : विधवा महिलांनाही समाजात जगताना मानसन्मान मिळावा, यासाठी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विधवा महिलांच्या पुनर्विवाहास सोळा हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही ग्रामपंचायत पहिलीच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. सरपंचपदी बाळासाहेब ढोले यांनी महिला उन्नतीसाठी व महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी गावातील महिलांना एकत्रित करून महिला महासंघामार्फत ३६ बचतगटांची स्थापना केली. बचतगटांना कर्ज उपलब्ध करून दिली आहे. महिलांना पूरक उद्योगांची उभारणी करून देत सक्षमीकरणाचे महत्त्वपूर्ण काम केले.

तसेच महिला बालकल्याण समितीतर्फे ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल तिथे मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरले. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विधवा विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी १६ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

कोरोनामुळे अनेक तरुण विवाहित जोडप्यांचे सहजीवन अडचणीत आले आहे. त्यातच अलीकडच्या काळात तरुण विवाहित तरुणांचे व्यसनाधीन व अपघाताने मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या पश्चात त्याच्या सहचारिणीचे उर्वरित जीवन हलाखीचे होते. या समस्येला छेद देण्यासाठी विधवा विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

- बाळासाहेब ढोले, सरपंच, आंबी खालसा