अहमदनगर : चौथऱ्यावरील दर्शन सशुल्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaneeshwar Devasthan

अहमदनगर : चौथऱ्यावरील दर्शन सशुल्क

सोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्टने पाचशे रुपये शुल्क घेऊन भक्तांना शनिचौथरा दर्शन आजपासून (शनिवार) खुले केले आहे. चौथ-यावर पूजासाहित्याला बंदी असून, फक्त तैलाभिषेकाकरिता परवानगी देण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहाशे भक्त या योजनेत सहभागी झाले होते. त्यातून तीन लाखांची देणगी जमा झाली.

मागील काही वर्षांत कोरोना व सुरक्षेच्या कारणास्तव चौथ-यावरील दर्शन बंद करण्यात आले होते. याबाबत मागील आठवड्यात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देशातील इतर देवस्थानांप्रमाणे चौथ-यावरील दर्शन सशुल्क करण्याचा निर्णय झाला. मंदिरात आलेल्या महिला किंवा पुरुष भाविकांना आपल्या हाताने स्वयंभू शनिमूर्तीवर तैलाभिषेक करायचा असेल, तर पाचशे रुपये देणगी ठेवण्यात आली आहे. महिलांच्या चौथ-यावरील दर्शनाबद्दल ग्रामस्थांत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. अनेक भाविकांनी देवस्थानाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भेदभाव करणारा निर्णय

हा निर्णय भाविकांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर पुरुष, महिला आणि तृतीयपंथींना दर्शनासाठी प्रवेश द्यावा, या मागणीसाठी आपण यापूर्वी आंदोलन केले. त्यानंतर चौथऱ्यावर प्रवेश देण्यास सुरुवात झाली. गरीब भाविक पाचशे रुपये देऊन चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेऊ शकत नाही. या निर्णयामुळे गरीब आणि श्रीमंत भेद निर्माण होईल. अनेक देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सशुल्क प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्था असते. वेळेअभावी रांगांमध्ये थांबणे शक्य नसते, असे भाविक सशुल्क दर्शन घेतात, अशी व्यवस्था असेल तर त्यास विरोध राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी सर्वांना चौथ-यावरून मोफत दर्शन असताना ढकलाढकली होत होती. सुरक्षेचाही प्रश्न होता. हाताने तेल अर्पण करण्याची इच्छा असणा-या भक्तांना आता पाचशे शुल्क द्यावे लागणार आहे. या देणगीचा विकासकामांसाठी उपयोग होईल.

- नितीन शेटे, सहायक कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान

शुल्क घेऊन चौथऱ्यावरून दर्शनाचा निर्णय खूपच चांगला आहे. मात्र, देवस्थानाने पूजासाहित्यातील सर्व यंत्रावर बंदी घातली असताना व्यावसायिक सक्ती व दादागिरी करीत आहेत. त्यावरही ठोस उपाययोजना करावी. काळ्या तिळाच्या नावाखाली सुरू असलेली भक्तांची फसवणूक थांबावी.

- परेश पटेल, भाविक, बडोदा (गुजरात)

Web Title: Ahmednagar Shaneeshwar Devasthan Trust Paid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top