Ahmednagar : नगरची सेना कोणाची ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Shiv Sena

Ahmednagar : नगरची सेना कोणाची ?

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेला दणका दिला आहे. जिल्हाप्रमुखपदी ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे व नगर शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे हे सुरवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना नगरमधून पहिले समर्थन दिले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल शिंदे यांनी फटाके उडवून जल्लोष केला होता. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, सुभाष लोंढे आदींनी उघड भूमिका घेत शिंदे गटात प्रवेश केला. आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नगर शहर व जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडली.

दरम्यान, शिंदे गटाचे पदाधिकारी कोण असतील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी (ता. २३) शिंदे गटाने नगर शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. जिल्हाप्रमुखपदी अनिल शिंदे, शहरप्रमुखपदी दिलीप सातपुते, संपर्कप्रमुखपदी सचिन जाधव, जिल्हा उपप्रमुखपदी सुभाष लोंढे, तर भिंगार शहरप्रमुखपदी सुनील लालबोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

ठाकरे गटाची दोन हजार प्रतिज्ञापत्रे

नगर शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातून शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे मागविली होती. त्यात श्रीगोंदे, पारनेर, नगर शहर व नगर तालुक्याला दोन हजार प्रतिज्ञापत्रांचे उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टाहून अधिक प्रतिज्ञापत्रे पाठविण्यात आली असल्याचे गाडे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून अनेक वर्षे झाली. त्यांना अद्याप काही करता आले नाही, तर मुख्यमंत्री शिंदे गट काय करणार आहे? निवडणुकीसाठी यांना माणसेदेखील मिळणार नाहीत. हे कसे आमच्यासमोर आव्हान उभे करणार, याचा विचार त्यांनीच करावा.

- प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख (ठाकरे गट)

Web Title: Ahmednagar Shiv Sena Shinde Group District Head Anil Shinde Dilip Satpute Sachin Jadhav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..