मालवाहतुकीने एसटी मालामाल... नगर अव्वल 

दौलत झावरे
मंगळवार, 30 जून 2020

जिल्ह्यासह राज्यात 22 मेपासूनच एसटीची मालवाहतूक सेवा सुरू झाली असली, तरी नगर विभागात खऱ्या अर्थाने एक जूनपासून ही सेवा सुरू झाली.

नगर ः कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. त्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी सरकारने मालवाहतुकीस परवानगी दिली. एक जूनपासून जिल्ह्यात एसटीद्वारे मालवाहतूक सेवा सुरू झाली. आतापर्यंत 27 मालवाहतूक एसटीच्या साहाय्याने 100 फेऱ्या पूर्ण करून नगरने राज्यात आघाडी घेतली आहे. त्यातून नगर विभागाला साडेसात लाखांचे उत्पन्न मिळाले. 

हेही वाचा ः शिक्षक बॅंकेचे साडेतीनशे कोटी रुपये पडून

कोरोनामुळे लॉकडाउन केल्याने एसटीच्या तोट्यात भर पडत गेली. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एसटी प्रशासनाला मालवाहतुकीची परवानगी दिली. जिल्ह्यासह राज्यात 22 मेपासूनच एसटीची मालवाहतूक सेवा सुरू झाली असली, तरी नगर विभागात खऱ्या अर्थाने एक जूनपासून ही सेवा सुरू झाली.

अवश्य वाचा ः घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं... अधिकार्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा

दापोली येथे तयार करण्यात आलेला पहिला मालवाहतूक ट्रक नगर विभागाला देण्यात आला. त्यानंतर हा मालवाहतूक ट्रक एक जूनला प्रथम नगर-पुणे असा धावला. 

एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 27 मालवाहतूक ट्रकच्या माध्यमातून 100 फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या. त्यांनी 16 हजार 918 किलोमीटर प्रवास केला. त्यातून नगर विभागाला सात लाख 49 हजार 700 रुपयांचे उत्पन्न मिळवाले. जिल्ह्यातील 11 आगारांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्‍यातील मालवाहतुकीची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एसटीत माल भरला जात आहे. 

प्रवासी एसटी तोट्यातच 
राज्य सरकारने प्रवासी वाहतुकीस एसटीला परवानगी दिली असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. त्यामुळे प्रवासी एसटीच्या फेऱ्या तोट्यात सुरू आहेत. 

जिल्ह्यातील 11 बसस्थानकांत नोंदणी कक्ष उभारले असून, नोंदणीनंतर तत्काळ मालवाहतूक ट्रक शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन माल भरून तो राज्यातील बाजारपेठेत नेला जातो. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar ST leads the state