
अहमदनगर : नोकरदारांना एसटी पास परवडेना
अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी एसटी प्रशासनाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये मासिक व नंतर त्रैमासिक पासने दैनंदिन निश्चित ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी वाढले होते. मात्र, कोरोना संकट व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीकडील प्रवासी आता खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करू लागले आहेत. त्याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर होत आहे.
जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांत एकाच मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाची मासिक व त्रैमासिक पासची सुविधा उपलब्ध आहे. प्रारंभी या सुविधेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, वाढलेले तिकीटदर, बसगाड्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पासधारकांची संख्या रोडावल्याने एसटीच्या उत्पन्नातही घट झाली.
नोकरी व इतर कामांसाठी रोज प्रवास करणारे प्रवासी एसटीकडे आकर्षित व्हावेत, यासाठी एसटी महामंडळाने मासिक व त्रैमासिक पास योजना सुरू केली. मासिक पास योजनेमध्ये २० दिवसांचे जाण्या-येण्याचे पैसे भरल्यानंतर ३० दिवस प्रवास करता देतो, तसेच त्रैमासिक योजनेत ५० दिवसांचे पैसे भरल्यानंतर ९० दिवस प्रवास करता येतो.
पाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्यात नऊ दिवस (शनिवार व रविवार) सुटी मिळते. तसेच सण-वारानिमित्त आणखी एक-दोन दिवस सुट्या मिळतात. त्यामुळे नोकरदारांचे मासिक व त्रैमासिक पास काढल्याने नुकसान होते. त्याचाही परिणाम पासधारक कमी होण्यात झाला आहे. सरकारी नोकरदार एसटीकडे पुन्हा वळवायचे असतील, तर एसटी प्रशासनाने पासधारकांच्या पासच्या मुदतीत वाढ करून देणे गरजेचे आहे. तसे केले तर एसटीकडे सरकारी नोकरदार प्रवासी म्हणून वाढ होण्यास मदत होणार आहे.
या ठिकाणांहून होते नोकरदारांची चढ-उतार
पाइपलाइन रस्ता, सावेडी नाका, चांदणी चौक, स्टेट बँक चौक, सह्याद्री, नेप्ती नाका, बोल्हेगाव फाटा आदी ठिकाणांहून रोज सरकारी नोकरदार नोकरीच्या ठिकाणी जात-येत असतात. त्यामुळे या परिसरात रोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत नोकरदारांची गर्दी असते. तसेच सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत या चौकात नोकरदारांना घरी नेण्यासाठी वाहनांची गर्दी होते.
सवलतीसाठी जीव धोक्यात
अवैध प्रवास वाहतूक जिल्ह्यात सध्या जोमाने सुरू आहे. पैसे कमी लागत असल्यामुळे, तसेच निश्चित स्थळी उतरता येत असल्यामुळे सरकारी नोकरदार एसटीऐवजी खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करीत असतात. यामध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खासगी वाहनांमध्ये बसवून प्रवासीलुटीच्या घटनाही घडत आहेत.
पासची योजना व लाभधारक
(मागील आकडेवारी)
अहिल्याबाई होळकर योजना ः ७४९२
विद्यार्थी मासिक पास ः २७६८
तांत्रिक शिक्षण व व्यावसायिक शिक्षण ः ८०६
त्रैमासिक पास योजना ः १२२
सरकारी नोकरदार कर्मचाऱ्यांना एसटीकडे वळवायचे असेल, तर त्यांच्यासाठी बस वेळेवर सोडणे व पास योजनेत दिवस वाढून देणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारी नोकरदारांनी एसटीने प्रवास करावा, यासाठी एसटी प्रशासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन प्रबोधन करणेही गरजेचे आहे.
- रणजित श्रीगोड, जिल्हाध्यक्ष, प्रवासी संघटना
Web Title: Ahmednagar St Pass Employees Cannot Afford
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..