Ahmednagar : विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास मंदावतोय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student

Ahmednagar : विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास मंदावतोय?

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास मंदावतोय?

क्रीडा स्पर्धांमधील सहभागाबाबत पालक उदासीन

मिरजगाव : मागील दोन वर्षे कोरोनामुळे होऊ न शकलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांची सुरवात आता झाली आहे. क्रीडाशिक्षक व संघटना स्पर्धांच्या पुनरागमनामुळे उत्साहित असताना विद्यार्थी मात्र स्पर्धेपासून दूर राहत असल्याचे चित्र अनेक शाळांमधून दिसत आहे. शालेय क्रीडा स्पर्धांची वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा कोरोना काळात खंडित झाली होती. याचा परिणाम होऊन अनेक शाळांतील क्रीडासंस्कृती विस्कळित झाली.

शिक्षणाच्या जीवघेण्या स्पर्धेत पालकांच्या आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासाबाबतच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास पालकांकडून प्रोत्साहन मिळताना दिसत नाही. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असताना, शारीरिक विकासाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरी भागात तर परिस्थिती आणखी दयनीय झालेली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीचे ओझे लहान वयातच मुलांवर टाकले जात आहे. मैदानी खेळांकडे होणारी ही डोळेझाक विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शारीरिक व्याधींना आमंत्रण देत आहे. शालेय क्रीडा स्पर्धांचा खेळाडूंना गुणवाढीसाठीही फायदा होतो. कोरोनामुळे दोन वर्षांनी स्पर्धा होत आहेत, त्यामुळे यंदा सहभाग वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, हा सहभाग 2019-20 च्या तुलनेत कमी झाला आहे.

या सांघिक खेळांकडे दुर्लक्ष

बॅडमिंटन, बास्केटबाँल, क्रिकेट, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, बॉल बॅडमिंटन, नेटबॉल, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल, बेसबॉल, रोलर हॉकी, रोल बॉल, डॉज बॉल, सेपाक टकरा, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाइट, शूटिंग बॉल, रग्बी, आट्या-पाट्या या खेळांकडे विद्यार्थ्यांचा कल पाहायला मिळत नाही.

शालेय जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळणे आवश्यक असतानादेखील पालकांची खेळाप्रती उदासीनता चिंताजनक आहे. शारीरिक व्याधींपासून मुलांना वाचवायचे असेल, तर त्यांना शालेय जीवनात खेळायला प्रवृत्त करणे काळाची गरज बनली आहे.

- सुभाष तनपुरे, उपाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा कबड्डी संघ