Ahmednagar News : पाणी द्या पाणी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar water issue corporators became aggressive in municipal council meeting

Ahmednagar News : पाणी द्या पाणी !

अहमदनगर : उन्हाळा सुरू होत असतानाच शहरात पाणीप्रश्न तीव्र झाला आहे. काही ठिकाणी आठ दिवस पाणी मिळत नाही. जे मिळते, तेही अवेळी. त्यामुळे बहुतेक नगरसेवकांच्या घरांवर महिलांचे मोर्चे येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून महानगरपालिकेच्या आजच्या सभेत नगरसेवकांनी त्रागा केला.

मनपाच्या सभेत विस्कळित पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका मीना चव्हाण यांनी त्यांच्या प्रभागातील प्रश्न आक्रमकपणे मांडला.

आधी विस्कळित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करा आणि मग महासभेला सुरवात करा, असा पवित्रा त्यांनी सुरवातीलाच घेतला. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सावेडी उपनगराचा पाणीप्रश्न विस्कळित होऊन गंभीर बनला आहे.

नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. हा पाणीप्रश्न महापालिका प्रशासन कधी सोडवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अमृत पाणीयोजना पूर्ण झाली आहे, तर पाणी का येत नाही, या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

आरोपाला उत्तर देताना महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, की सोमवारी आयुक्त व उपमहापौर यांच्या समवेत पाहणी करून बैठक घेऊ व पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. या वेळी अभियंता गणेश गाडळकर यांनी सांगितले, की अमृत पाणीयोजनेची मार्चअखेर सर्व कामे पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

अधिकाऱ्यांकडून दिशाभूल

शहरातील स्टेशन रोड, काटवन खंडोबा रोड, कल्याण रोड परिसरातील विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत सर्वसाधारण सभेत नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी आक्रमक होत अधिकारी, अभियंते व प्रशासनावर दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

आनंदनगर, आगरकर मळा, सागर कॉम्प्लेक्स, गजानन कॉलनी, स्मृती कॉलनी, विशाल, एकता, अर्बन बँक कॉलनी, मल्हार चौक, पराग पार्क, संजीवनी कॉलनी, अचानक वस्ती प्रियांका कॉम्प्लेक्स, सुखकर्ता, बोहरी चाळ, गवळीवाडा, स्वामी समर्थ कॉलनी, इंगळे वस्ती, पंचशीलनगर, गायके मळा, संपूर्ण काटवन खंडोबा रोड, कल्याण रोड परिसरातील पाणीपुरवठा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विस्कळित झालेला आहे.

संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्याला नागरिकांनी फोन केला असता, संबंधित अधिकारी उलटी उत्तरे देतात. या परिसरातील व्हॉल्व्हमन व संबंधित पुरवठा अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्याची वारंवार दिशाभूल करीत आहेत. संबंधित पाणीपुरवठा अधिकारी व व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांना सांगून स्टेशन रोड, काटवन, कल्याण रोड भागातील पाणीपुरवठा लवकर सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांसह महापालिकेत हंडा मोर्चा आणून आंदोलन करेल, असा इशाराही जाधव यांनी दिला.

हंडे घेऊन महिला नगरसेवकांच्या घरी

नागरिकांना पाणी मिळत नाही. नगरसेवकांच्या घरांवर महिला हंडे घेऊन मोर्चे आणतात. त्यांना काय उत्तरे द्यावीत? नगरसेवकांच्या घरांतील पाणी महिला ओतून नेतात. काही जण स्वतः खर्च करून संबंधित भागात टँकर पाठवितात. असे किती दिवस चालायचे, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली.