
Ahmednagar : लग्नपत्रिकेच्या हौसेला महागाईचा खोडा
अहमदनगर : लग्न सोहळ्याचे निमंत्रण द्यायचे झाल्यास लग्नपत्रिकांशिवाय गत्यंतर नाही. हौशी कुटुंब असेल तर विविध प्रकारच्या लग्नपत्रिका छापून निमंत्रित केले जाते. परंतु ही हौस सध्या महागात पडत आहे. ३० ते ४० टक्क्यांपर्यंत भाववाढ झाल्याने मुद्रकही मेटाकुटीस आले आहेत.
कोरोनानंतर कलर आणि कागदाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे लग्नपत्रिकांनाही व्हॉटसअॅप निमंत्रणाचा उपाय शोधला आहे. काहीजण फेसबुकच्या माध्यमातून निमंत्रण पाठिवत आहेत. गावात फ्लेक्स लावून जाहीर आमंत्रण देत देण्याचा ट्रेंड सुरू आहे. व्यवसाय कमी झाल्याने अनेक मुद्रक आर्थिक अडचणीत आले आहेत. काहीजण लग्नपत्रिका छापायला येतात. मात्र, त्यांना या भाववाढ मुद्दा पटवून देताना प्रिंटिंग चालकांच्या नाकीनऊ येतात. फोरकलर पत्रिका, पेपर मॅपलितो, आर्टपेपर, रेडिमेड, फोरकलर, लखोटा, पाकिट, कार्डसीट, डायपत्रिका अशा प्रकारच्या पत्रिका आहेत. पत्रिकांव्यतिरिक्त कॅलेंडर, बँकेची स्टेशनरी, पुस्तके, डायरी, पॉम्प्लेट, ब्रोशर्स, बिल बुक, व्हिजिटिंग कार्ड, फ्लेक्स अशा स्वरुपाची कामे मुद्रकांकडे येतात. आजही ही कामे सुरू आहेत.
भाववाढ कशामुळे ?
चीनमध्ये कमी झालेले पेपर उत्पादन
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
श्रीलंका-पाकिस्तानातील आर्थिक आणिबाणीचाही
कोरोना काळात पेपर रद्दी कमी
उसाचा भुसा, लाकडाचाही इंधन म्हणून वापर कमी झाल्याने पेपरचे उत्पादन कमी
देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या मालाला परदेशातून मागणी वाढली
वाढलेले दर असे
फोरकलर पत्रिका ४ हजार ५००
पेपर मॅपलितो रिम १ हजार १००
आर्ट पेपर ३ हजार २००
शाई १०० रूपये किलो
मुद्रकाकडे माणसाचे जन्मापासून मरणापर्यंतच्या पत्रिकांचे काम असते. आजही लग्नपत्रिका तसेच फ्लेक्स, निवडणुकीची, बँकेच्या स्टेशनरीची कामे असतात. परंतु भाववाढीचा मुद्दा ग्राहकांना समजून सांगताना नाकीनऊ येतात.
- सिद्धिनाथ मेटे, मुद्रक
आंतरराष्ट्रीय बाजारात कागदाचा तुटवडा आहे. युरोप, अमेरिकाही भारतातून पेपर खरेदी करते. शाईचे दर वाढले आहेत. परिमाणी प्रिटिंगमध्ये ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
-सर्वेश बार्शीकर, पुरवठादार, नगर
कोरोनानंतर अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला. कामगारांचेही पगार वाढले.. कागदाच्या अनिश्चित दरामुळे नवीन कोणतेही कंत्राट घेता येत नाही. सरकारनेच दराबाबत नियम निश्चित केले पाहिजे.
- संदीप ठुबे, अध्यक्ष, प्रेस अलाईन ओनर असोसिएशन