
शहरात भुयार गटारीची कामे जूनअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे मार्चअखेरीस लॉकडाउन जाहीर होईपर्यंत भुयारी गटारीचे केवळ 30 टक्के कामच झाले होते.
नगर ः केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेतून शहरातील भुयार गटार व मल:निस्सारणासाठी 124 कोटींचा निधी मंजूर झाला. त्याला आता अडीच वर्षे झाली, तरी योजनेचे केवळ 40 टक्केच काम झाले आहे.
कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून थांबलेले काम आता पुन्हा सुरू झाले आहे. केंद्र सरकारने 2017मध्ये महापालिकेसाठी अमृत योजना मंजूर केली. त्यासाठी मंजूर झालेल्या 124 कोटींच्या निधीतून शहरात 146 किलोमीटरचे भुयारी गटार व मल:निस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली.
महापालिकेने हे काम नंदुरबार येथील ड्रिम कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे गटारे अपुरी पडतात. शिवाय मल:निस्सारण प्रकल्प नसल्याने शहरातील सांडपाणी गटारांद्वारे सीना नदीत सोडण्यात येते. परिणामी, सीना नदी प्रदूषित होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने दोन वेळा महापालिकेला नोटिसा बजाविल्या. त्यामुळे शहरासाठी अमृत योजनेतून होणारे काम महत्त्वपूर्ण असले, तरी ते संथ गतीने सुरू आहे.
हेही वाचा - आमदार बबनराव पाचपुतेंना कोरोनाची लागण
शहरात भुयार गटारीची कामे जूनअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे मार्चअखेरीस लॉकडाउन जाहीर होईपर्यंत भुयारी गटारीचे केवळ 30 टक्के कामच झाले होते. महापालिकेने या कामाला मुदतवाढ दिली. त्यानुसार, मार्च-2021 अखेर हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
लॉकडाउनमधून शिथिलता दिल्यानंतर हे काम पुन्हा सुरू झाले. पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांच्याकडे या कामाची जबाबदारी आहे. शहरातील जनरल पोस्ट ऑफिस चौक ते जुनी महापालिका रस्त्यासह पाच ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यासाठी जेसीबी, रस्ते खोदणारे मशीन व 300 कामगार कार्यरत आहेत.
जनरल पोस्ट ऑफिस ते जुन्या महापालिका रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, टपाल कार्यालय, जातपडताळणी कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, बूथ हॉस्पिटल, जूनी महापालिका आदी महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. या कामामुळे या आस्थापनांत जाण्यासाठी नागरिकांना अडथळे पार करावे लागतात.
रस्त्यांची कामे रखडली
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जनरल पोस्ट ऑफिस ते डावरे गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय ते सीएसआरडी, जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक या रस्त्यांची कामे आमदार संग्राम जगताप यांनी दीड वर्षांपूर्वी मंजूर करून आणली. त्यासाठी एक कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे; मात्र अमृत भुयारी गटार योजनेचे काम होत नसल्याने रस्त्यांची कामे प्रलंबित आहे. याबाबत जगताप यांनी पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती.
शहरात अमृत योजनेतील भुयारी गटारीचे काम 40 टक्के झालेले आहे. आगामी चार महिन्यांत हे काम पूर्ण होण्यासाठी नियोजन केले आहे. भुयारी गटारीसाठी 300 मिलीमीटर व्यासाचे पाईप टाकले जात आहेत.
- रोहिदास सातपुते, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, नगर महापालिका.